अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १४ एप्रिल २०२५:- जिल्ह्यातील काही मेडिकल दुकानांमध्ये आरोग्यसेवेसोबत गंभीर थट्टा केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. काही दुकानदारांनी दवाखान्यात औषधे विकण्यासाठी ना फार्मासिस्ट नेमले आहेत, ना वैद्यकीय शिक्षण घेतलेले कर्मचारी ठेवले आहेत. उलट, केवळ १०वी आणि १२वी उत्तीर्ण असलेले मजूर औषध विक्री करत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठे संकट निर्माण झाले असून, अन्न व औषध प्रशासन (FDA) या सर्व प्रकारांकडे मृगजळासारखे दुर्लक्ष करत आहे.
औषध हे थेट माणसाच्या शरीरावर प्रभाव टाकणारे माध्यम आहे. चुकीचे औषध, चुकीच्या प्रमाणात दिले गेले, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. पण अकोल्यात काही मेडिकल दुकानदारांना फक्त नफा कमावण्याचे वेध लागले आहेत. शहरातील व ग्रामीण भागातील काही मेडिकल्समध्ये वैद्यकीय शिक्षण नसलेले मजूर सहजपणे ग्राहकांना औषधे देताना दिसत आहेत. कोणते औषध कोणत्या आजारासाठी द्यावे, याची त्यांना कोणतीही माहिती नसते.
प्रत्येक मेडिकल दुकानात डिप्लोमा किंवा डिग्रीधारक फार्मासिस्ट असणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. पण अकोल्यातील अनेक मेडिकल्समध्ये फार्मासिस्ट फक्त कागदावरच दिसतात. प्रत्यक्षात दुकान चालवतो तो १०वी-१२वी पास मजूर. काही ठिकाणी फार्मासिस्टचा सर्टिफिकेट लावलेला असतो, पण तो व्यक्ती तिथे नसतोच. हे सर्टिफिकेट भाड्याने घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकारांबाबत अन्न व औषध प्रशासन मात्र मौन बाळगून आहे. अन्न औषध विभागाने वेळोवेळी तपासणी करणे अपेक्षित आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र कारवाया शून्य होत आहेत. मेडिकल दुकानदार आणि प्रशासन यांच्यात मिलीभगत आहे. त्यामुळेच या गैरप्रकारांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.
अकोट, बाळापूर, तेल्हारा,मुर्तिजापूर, पातूर, आणि काही शहरी भागांमध्ये
औषध विक्री कायद्यानुसार, 1940 च्या औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील कलम 42 नुसार, योग्य परवाना व प्रशिक्षित फार्मासिस्टशिवाय औषधे विक्री करणे गुन्हा आहे. या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असूनही, प्रशासन केवळ निरीक्षक पातळीवर तपासणी करून फाईल बंद करत असल्याचे आरोप आहेत. या सर्व प्रकारांमुळे अकोल्यातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे.
आता तरी प्रशासन जागं होणार का?
हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. ज्या विभागाने आरोग्यविषयक गैरप्रकार रोखायला हवे, तेच जर डोळे झाकून बसले, तर नागरिकांनी विश्वास कुणावर ठेवायचा? अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
