अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १३ एप्रिल २०२५:- दानापूर गावात शेकडो वर्षांची परंपरा असलेला ‘दावण ओढण्याचा’ विधी यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. चैत्र पौर्णिमेनिमित्त विविध कुलदैवतांच्या नवसपूर्तीसाठी गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने गाड्या ओढल्या. तालुक्यातील दानापूर गावात शतकांपासून चालत आलेली ‘दावण ओढ’ ही पारंपरिक प्रथा यंदाही मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली.
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गावकऱ्यांनी आपल्या कुलदैवताच्या नवसपूर्तीसाठी ही खास परंपरा जपली.या दिवशी पाच बैलगाड्यांना एकमेकांना जोडून तयार केलेली ‘दावण’ गावाच्या मुख्य मार्गाने मिरवली जाते. गाड्यांमध्ये लहान मुले बसवली जातात, तर पहिल्या गाडीत सुवासिनी स्त्रिया पूजेचे ताट घेऊन बसतात. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सुवासिनी स्त्रिया आणि भगत यांच्या ग्रामदैवतस्थळी पूजा-अर्चनेने होते.
सायंकाळी पाच वाजता पारंपरिक दिंडीसारखी ‘दावण’ गावातून निघते. दोन किलोमीटर लांबीच्या मार्गावर रंगीबेरंगी रांगोळी काढून सजावट केली जाते. संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण होते.गावातील विविध भागांतून वेगवेगळ्या दावणी निघतात, आणि प्रत्येक दावण मागे मोठ्या संख्येने भाविक चालत असतात.कार्यक्रमानंतर सायंकाळी सहा वाजता महाप्रसादाचे आयोजन होते. ही परंपरा आजही गावकऱ्यांनी एकजुटीने जपलेली असून, श्रद्धा, भक्ती आणि एकोप्याचे उत्तम प्रतीक म्हणून ती पाहिली जाते.
