अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ३ एप्रिल २०२५:- सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या भागात गेल्या काही महिन्यांपासून पट्टेदार वाघ आणि बिबट यांचा सक्रिय वावर जाणवत असून, त्यांनी अनेक पाळीव जनावरांचा फडशा पाडला आहे. विशेषतः, रात्रीच्या वेळी विद्युतपुरवठा खंडित असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत हे हिंस्र पशू हल्ले करत असल्याचे दिसून आले आहे.
३ एप्रिलच्या पहाटे, वारा आणि वादळी पावसामुळे संपूर्ण परिसरात महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाला. या संधीचा फायदा घेत एका हिंस्र वन्यप्राण्याने चंदनपूर रेल्वे स्टेशन नजीक राहणाऱ्या अमर सिंग मसाने यांच्या गोठ्यात घुसून तेथे बांधलेल्या पाळीव गोऱ्याचा शिकार केला. गोरा बांधलेला असल्याने त्याला प्रतिकाराची संधीही मिळाली नाही आणि त्याला जागीच प्राण गमवावे लागले.

अंधारामुळे आणि घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने या प्राण्यावर हल्ला करणारा नेमका कोणता हिंस्त्र वन्यप्राणी होता, हे स्पष्ट होऊ शकले नाही. वाघाचा वावर पूर्वीही या भागात जाणवला असून बिबट्यांचेही दर्शन झाले आहे. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा भाग त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अनेक वेळा विनंती केल्यानंतर अखेर झरी येथील वनविभागाचे सोळंके घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करण्यास सुरुवात केलं.या घटनेनंतर हिवरखेड आणि चंदनपूर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संतापाची भावना आहे. आधीच शेती आणि जनावरांच्या जीवावर अवलंबून असलेल्या या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना आता हिंस्र प्राण्यांच्या वाढत्या धोक्याने अधिक अडचणीत टाकले आहे. शासनाने आणि वनविभागाने त्वरित उपाययोजना करून नागरिकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.
