akola mns ultimatum कोर्टाने दिलेल्या मराठी पाट्यांचा अल्टिमेटम आता चार दिवसात संपत आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अगोदरपासून मराठी पाट्यांच्या संदर्भात आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं होत. मात्र यावेळी मनसेनं दुकानदारांनी पाट्या बदल्या नाही तर मनसे पुन्हा खळकट्याक करेल असा इशारा दिला आहे.
25 तारखे पर्यंत जर अकोल्यातील व्यवसायिकांनी आपल्या दुकानाच्या पाट्या बदलून मराठीत केल्या नाही तर मात्र आम्ही आमच्या खळकट्याक स्टाईलने पाट्या उतरवू अशी विनंती वजा ईशारा अकोला जिल्ह्या मनसे अध्यक्ष पंकज साबळे व मनसे सैनिकांनी केले आहे.
महाराष्ट्रात दुकानावरील पाट्या मराठी मध्ये पण असाव्यात ह्या साठी मा सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबर ची कालमर्यादा दिलेली आहे.ही कालमर्यादा २ दिवसात संपत आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पदाधिकारी ह्यांनी आज दि २३ नोव्हेंबर रोजी एक निवेदन अकोला मनपा आयुक्त ह्यांना देऊन ह्या संदर्भात अवलोकीत केले आहे.
त्यात असे नमूद आहे की बाजार परवाना विभाग ने सर्व दुकानदारांना ह्या संदर्भात सूचित करावे व जिथे नसेल त्यांना दुकानावरील पाट्या मराठीत करण्यास भाग पाडावे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष ह्याबाबतीत सदैव आग्रही राहिलेला आहे.
तसेच पुढील दोन दिवसा नंतर ज्या आस्थापनेवर मराठी फलक आढळून येणार नाही तेथे मनसे शैलीत खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात येईल असे नमूद आहे. निवेदन देतांना मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहर अध्यक्ष सौरभ भगत, उपशहर अध्यक्ष राजेश पिंजरकर, मुकेश धोंडफळे, चंदू अग्रवाल, शुभम कवोकार, विभाग अध्यक्ष अमोल भेंडारकर, कुणाल सप्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
कोर्ट कचेरीत पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा, अशी कानउघडणी करत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्याची ही नामी संधी आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत संपूर्ण राज्यभरातील सर्व दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या दिसण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं.
‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरु नका, असा इशाराही त्यांनी दिला होता.
काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे. असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे.