अकोला शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवघ्या ४८ तासांत दुसरे हत्याकांड घडल्याने शहर हादरून गेले आहे. संजय नगर परिसरात अमोल दिगंबर पवार (वय ३५) या युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नितेश अरुण जंजाळ याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.
२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास मोठी उमरी परिसरातील संजय नगर येथे एक युवक मृतावस्थेत आढळल्याची माहिती सिव्हिल लाईन पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात अमोल पवार याला नितेश जंजाळ याने मारहाण केल्याचे निष्पन्न झाले असून, या मारहाणीतच अमोलचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, नववर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर २०२५ रोजी कृषी नगर परिसरात तंबाखूच्या वादातून एका इसमाची हत्या झाली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पुन्हा एक खून घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. “शहर सुरक्षित आहे का?” असा थेट सवाल आता अकोलेकर विचारत आहेत.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून, उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अमोल पवार आणि नितेश जंजाळ हे दोघेही चांगले मित्र होते. किरकोळ वादातून भांडण विकोपाला गेले आणि हाणामारीत रूपांतर झाले. याच हाणामारीत अमोलला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला अटक करण्यात आली असून, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकामागोमाग एक घडणाऱ्या हत्याकांडांमुळे पोलिसांच्या गस्त, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अकोल्यात वाढणारी हिंसक गुन्हेगारी थांबवणार कोण?
हे हत्यासत्र रोखण्यासाठी पोलिस प्रशासन आता कोणती ठोस पावले उचलणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.









