अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २८ मार्च २०२५ – शहरातील नागपुरी जिन परिसरातील अग्रवाल इलेक्ट्रॉनिक्सच्या गोडाऊनमधून चोरीस गेलेल्या एसी आणि फ्रीज प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. अवघ्या काही दिवसांत आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली असून चोरीस गेलेल्या ३.७० लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
गोडाऊनमधील स्टॉक कमी असल्याचे लक्षात येताच गुन्ह्याचा तपास सुरू
दि. २६ मार्च २०२५ रोजी, व्यापारी यश संजय अग्रवाल (रा. राधे नगर, अकोला) यांनी त्यांच्या गोडाऊनची पाहणी केली असता, स्टॉकमध्ये कमतरता असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने स्टॉक तपासणी केली असता ०१ फेब्रुवारी ते २६ मार्च २०२५ या कालावधीत ६ नग LG १.५ टन ३ स्टार ड्युअल इन्व्हर्टर एसी, १ नग LG ५ स्टार ड्युअल इन्व्हर्टर एसी, तसेच २०१ आणि १८५ लिटर क्षमतेचे २ फ्रिज असा एकूण ३,७०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघड झाले.
याप्रकरणी अग्रवाल यांनी तात्काळ सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गोपनीय सूत्रांकडून माहिती गोळा केली. यातून संशयित आरोपी मोहम्मद रफीक मोहम्मद युसुफ (वय २३ वर्षे, रा. भारत नगर, अकोट फाईल, अकोला) याचा माग काढण्यात यश मिळाले.
पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांच्या कसून चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि संपूर्ण चोरीचा माल जप्त करण्यात यश आले.
पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पो.नि. सुनिल वायदंडे, स.पो.नि. किशोर पवार यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकातील
पोहेकॉ. अश्विन सिरसाट, अजय भटकर, ख्वाजा शेख, किशोर येऊल
पो.कॉ. निलेश बुंदे, शैलेश घुगे
यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. अश्विन सिरसाट करीत आहेत.
शहरातील व्यापाऱ्यांनी घ्यावी दक्षता – पोलिसांचे आवाहन
या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि गोडाऊनसाठी सीसीटीव्ही तसेच सुरक्षाव्यवस्था सक्षम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सिटी कोतवाली पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला असून पोलिसांचे कौतुक होत आहे.
        
			
        
        
        




