Ads

महापालिकेत भाजपाचा विजयरथ वेगात! मतदानापूर्वीच ११ जागांवर बिनविरोध विजय, शहरोगरी सत्ता मजबूत

By Nilesh Sir

January 1, 2026 6:23 pm

Ads

मतदानाचा पहिला बटन दाबण्याआधीच राजकीय चित्र स्पष्ट होत चाललं आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपाचा विजयरथ वेगाने पुढे सरकत असून, थेट बिनविरोध विजयांच्या मालिकेने विरोधकांची गणितं कोलमडू लागली आहेत.

महापालिका निवडणुकीत चा विजयरथ वेगाने धावत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मतदान होण्यापूर्वीच भाजपाने तब्बल ११ जागांवर बिनविरोध विजय मिळवत निवडणूक रणांगणात मोठी आघाडी घेतली आहे. कल्याण–डोंबिवली, धुळे, पनवेल, जळगाव आणि भिवंडी या महापालिकांमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी कोणतीही थेट लढत न होता विजय मिळवला असून, त्यामुळे विरोधकांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कल्याण–डोंबिवली महापालिकेत अर्ज छाननी झाल्याच दिवशी भाजपाच्या रेखा चौधरी, आसावरी नवरे आणि रंजना पेणकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. अर्ज माघारीची प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू होताच भाजपाच्या मंदा सुभाष पाटील आणि ज्योती पवन पाटील या आणखी दोन उमेदवारही बिनविरोध विजयी ठरल्या. त्यामुळे कल्याण–डोंबिवलीत भाजपाची पकड अधिक मजबूत झाली आहे.

पनवेल महापालिकेत प्रभाग क्रमांक १८ मधून नितीन पाटील हे अर्ज छाननीच्या दिवशीच बिनविरोध विजयी झाले. शेकाप–महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने भाजपाला थेट विजय मिळाला.

धुळे महापालिकेतही भाजपाचा प्रभाव दिसून आला. अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी सुरेखा उगले विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक १ मधून उज्ज्वला भोसले, तर ज्योत्सना पाटील याही बिनविरोध निवडून आल्या.

याशिवाय जळगाव महापालिकेत भाजपाच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, तर भिवंडी महापालिकेत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमीत पाटील बिनविरोध निवडून आले आहेत.

एकूणच, मतदानापूर्वीच मिळालेल्या या बिनविरोध विजयांमुळे भाजपाची शहरी भागातील ताकद अधोरेखित झाली असून, उर्वरित निवडणुकांवरही या यशाचा थेट परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

No comments to show.

Leave a Comment