विदर्भाच्या उद्योगविश्वाला नवे बळ; अकोल्यात VITEX-2026 भव्य व्यापार प्रदर्शनी – १८० हून अधिक स्टॉल्ससह जय्यत तयारी

विदर्भातील व्यापार, उद्योग आणि उद्योजकतेसाठी एक मोठी पर्वणी ठरणारी VITEX-2026 ही भव्य व्यापार व उद्योग प्रदर्शनी उद्या शुक्रवार दिनांक २ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान अकोला शहरात आयोजित करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भाच्या आर्थिक विकासाला गती देणाऱ्या या प्रदर्शनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

अकोला शहरातील गोरक्षण रोड येथील गोरक्षण संस्थान ग्राउंड येथे होणाऱ्या या चार दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी मार्वल ट्रिनीटी रियल एस्टेट एलएलपी हे मुख्य प्रायोजक असून विठ्ठल ऑईल सहप्रायोजक म्हणून सहभागी झाले आहेत.

VITEX-2026 मध्ये १८० पेक्षा अधिक आकर्षक स्टॉल्स उभारले जाणार असून, यात पश्चिम विदर्भातील लघु व मध्यम उद्योग, व्यापारी, सेवा प्रदाते तसेच नवउद्योजकांना आपली उत्पादने सादर करण्याची आणि थेट विक्रीची मोठी संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे ही प्रदर्शनी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी मोफत खुली असणार आहे.

https://www.instagram.com/reel/DS9pX7wDXs6/?igsh=OTJucXZ3a2plN29z

या प्रदर्शनात सोलर ऊर्जा, फर्निचर, ऑटोमोबाईल्स, एग्रो प्रोसेसिंग, बँकिंग व फायनान्स, रोबोटिक्स, वेलनेस, ऑर्गेनिक व हर्बल उत्पादने, फायर सेफ्टी यांसह विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार आणि स्टार्ट-अप्ससाठी हे एक महत्त्वाचे नेटवर्किंग आणि व्यवसायवृद्धीचे व्यासपीठ ठरणार आहे.

स्वदेशी, मेक इन इंडिया आणि वोकल फॉर लोकल या संकल्पनांना चालना देणे, स्थानिक रोजगारनिर्मिती वाढवणे आणि अकोला जिल्ह्याला एक विकसित व्यापारी केंद्र म्हणून अधोरेखित करणे, हा VITEX-2026 चा मुख्य उद्देश आहे.

उद्योग, व्यापार आणि नवउद्योजकतेसाठी VITEX-2026 हे विदर्भातील दिशादर्शक प्रदर्शन ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उद्योगमहोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment