अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १२ मार्च २०२५ स्वप्नील सुरवाडे प्रतिनिधी पातूर: “मनुष्याचा जन्म हा पुन्हा मिळत नाही” असे आपण म्हणतो, पण या जीवन प्रवासात अडथळ्यांचे डोंगर पार करताना अनेकांना हार पत्करावी लागते. संकटांच्या गर्तेत सापडलेल्या अनेकांनी मानसिक तणावाखाली टोकाची पावले उचलली आहेत. कालच एका तरुणाने पातूरमध्ये आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची धग अजून थंड झालेली नसताना, आज पुन्हा एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शेतशिवारात युवतीची गळफास घेऊन आत्महत्येची घटना
पातूरपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आयटीआय कॉलेज समोरील एका पळसाच्या झाडाला २३ वर्षीय युवती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. सकाळी गुराख्यांना ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित पत्रकार स्वप्निल सुरवाडे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना देखील तातडीने कळवण्यात आले.
मृत तरुणीची ओळख आणि प्राथमिक तपास
घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन तडसे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक पंचनामा केल्यानंतर, सदर युवतीचे नाव राधा रतन सोळंके (वय २३, रा. देऊळगाव, ता. पातूर) असल्याचे निष्पन्न झाले. परंतु आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी त्वरित मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवला असून, पुढील चौकशी सुरू आहे.
आयुष्य अनमोल आहे: मदतीसाठी हात पुढे करा
“आयुष्य कठीण असू शकते, पण प्रत्येक समस्येचे उत्तर मरण नसते. संवाद करा, मदतीसाठी हात पुढे करा आणि आयुष्याला नवी दिशा द्या.” आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा शेवट नसून, मदतीची गरज असलेल्या व्यक्तींना योग्य वेळी सहकार्य मिळणे महत्त्वाचे आहे.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, पोलिसांना युवतीच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान आहे. आतापर्यंत आत्महत्येमागील कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नाही. मात्र, तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणामुळे समाज म्हणून आपण काहीतरी करण्याची गरज आहे.
पातूर तालुक्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी समाजमन हेलावून टाकले आहे. विशेषतः तरुणाई मोठ्या संख्येने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मानसिक आरोग्य आणि समस्या हाताळण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. यामुळेच पालक, शिक्षक, समाज आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे आत्महत्येच्या सत्राला आळा घालण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.