कोण बाद, कोण मैदानात? अर्ज छाननीकडे अकोल्याचं लक्ष

निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याआधीच आज अकोल्यात मोठी कसोटी सुरू झाली आहे. कोण मैदानात टिकणार आणि कोणाचा राजकीय प्रवास अर्ज छाननीतच थांबणार, याचा फैसला आज होणार असल्याने महापालिका परिसरात तणाव, उत्सुकता आणि हालचालींना वेग आला आहे.

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आज ३१ डिसेंबरपासून प्राप्त अर्जांच्या छाननी प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेसाठी महापालिका प्रशासनाकडून स्वतंत्र कक्षांची व्यवस्था करण्यात आली असून, अर्जातील कागदपत्रांची तपासणी, पात्रता पडताळणी आणि आवश्यक नोंदी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

छाननी प्रक्रियेला सुरुवात होताच विविध प्रभागांतील उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध हरकती दाखल करण्यास सुरुवात केल्याने महापालिका प्रशासनात युक्तिवादांचा मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक हरकत गांभीर्याने नोंदवून घेत असून, नियमांनुसार त्या हरकतींचे निराकरण करण्याचा प्रयत्न कर्मचारी करत आहेत.

दरम्यान, छाननीच्या पार्श्वभूमीवर महापालिका परिसरात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

आज संध्याकाळपर्यंत कोणाचे अर्ज मंजूर होतात आणि कोणाचे अर्ज बाद होतात, याचे चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे रणांगण कोणासाठी खुले होते हे समजणार आहे. त्यामुळे अर्ज छाननीच्या या प्रक्रियेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment