अकोल्यात ACBचा मोठा धक्का! दहीहांडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लाचप्रकरणी अडचणीत

खाकीवरचा डाग पुन्हा एकदा उघड झाला आहे. कायद्याचा धाक दाखवून नागरिकांकडून लाच उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अकोल्यात ACBने जोरदार धक्का दिला असून, दहीहांडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकही आता थेट भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकला आहे. लाचखोरीविरोधात शून्य सहनशीलतेचा इशारा देणारी ही कारवाई पोलीस दलासाठीच नव्हे, तर संपूर्ण प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात आहे.

अकोला जिल्ह्यात अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB) ने भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत दहीहांडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विनोद आनंदराव खेडकर यांना लाचप्रकरणात आरोपी केले आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, लाचखोरीविरोधातील ACBची भूमिका पुन्हा एकदा ठामपणे समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहीहांडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 179/2025 च्या तपासात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भागवत कांबळे यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ३० जून २०२५ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो, अकोला येथे तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या पडताळणीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १६ जुलै २०२५ रोजी अकोला–अकोट रोडवरील कासली फाटा येथे सापळा रचण्यात आला. या सापळ्यात कांबळे यांनी पंचासमक्ष ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणाच्या पुढील तपासात पोलीस नाईक विनोद आनंदराव खेडकर यांनी आरोपी कांबळे यांना लाच मागणी व स्वीकार प्रक्रियेत चिथावणी व प्रोत्साहन दिल्याचे संभाषणातून स्पष्ट झाल्याने, त्यांच्यावरही गुन्ह्यात कलम वाढवून आरोपी करण्यात आले आहे.

अॅन्टी करप्शन ब्युरोने या कारवाईनंतर नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाच मागत असल्यास तात्काळ ACB अकोला कार्यालयाशी संपर्क साधावा. लाचखोरीविरोधातील ही कारवाई भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला बळ देणारी ठरत आहे.

Leave a Comment