अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २१ जानेवारी २०२५ :- अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत पकडत गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात हिसकावलेले मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दि. २० जानेवारी २०२५ रोजी रात्री आदित्य दीपक दळवी वय २२ वर्षे, रा. शेलगाव देशमुख, ता. मेहकर, जि. बुलढाणा हल्ली मुक्काम देशमुख फाईल हे रामदासपेठ परिसरात रस्त्याने पायी जात होते. यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले व त्यांचे दोन मोबाईल हिसकावून मोटारसायकलवरून पळ काढला. फिर्यादीने तत्काळ रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे हातात घेतली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान, शोएब खान शब्बीर खान (वय २० वर्षे) हा प्रमुख आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
शोएब खानने त्याचा साथीदार, जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे, याच्यासह मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली. तपासादरम्यान, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या Hero Splendor मोटारसायकलसह खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
यात Redmi मोबाईल, किंमत ₹८,००० Realme मोबाईल किंमत ₹६,००० Hero Splendor मोटारसायकल काळ्या रंगाची किंमत ₹ ७०,००० रुपये आरोपी कडून असा एकूण किंमत ₹८४,००० मुद्देमाल जप्त केलेल्या मोबाईलच्या IMEI क्रमांकांची खात्री केली गेली आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, फिरोज खान, सुलतान पठाण, वसीमोद्दीन, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, धीरज वानखडे, मोहम्मद आमीर आणि सतीश पवार यांनी केली.
गुन्ह्यातील आरोपींना लवकरच गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेने दाखवलेल्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. या कामगिरीमुळे रामदासपेठ परिसरातील नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेवरील विश्वास आणखी दृढ झाला आहे.
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वापरण्यास सावधगिरी बाळगावी व संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी म्हटले आहे.
रामदासपेठ येथील ही घटना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरली असून, पोलिसांच्या जलद कारवाईमुळे मोठा गुन्हा उघडकीस आला आहे.