अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो कुटासा प्रतिनिधी कुशल भगत दिनांक १ नोव्हेंबर २०२६ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अकोट तालुक्यातील कुटासा येथील भगवान कोटेश्वर मंदिरात भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ३०० रुग्णांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला, तर मोतीबिंदूचे निदान झालेल्या ७० रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. याशिवाय १०० रुग्णांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे मुख्य प्रतोद तथा आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दम्माणी नेत्र रुग्णालयाचे संचालक सभापती शुक्ल उपस्थित होते. यावेळी मुख्य शल्यचिकित्सक मनीष गुप्ता, भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकार, कोटेश्वर संस्थानचे अध्यक्ष माधवराव चतार, कराळे ज्वेलर्सचे संचालक मंगेश कराळे, रोटरी क्लब अकोलाचे अध्यक्ष गिरीष धावलीया, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती विजयसिंग सोळंके यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
७० रुग्णांवर अकोल्यात मोफत शस्त्रक्रिया
शिबिरात तपासणीदरम्यान मोतीबिंदूचे निदान झालेल्या ७० रुग्णांवर अकोला येथील दम्माणी नेत्र रुग्णालयात विनाटाका अत्याधुनिक पद्धतीने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च जगद्गुरू डॉक्टर सर, दम्माणी नेत्र रुग्णालय, रोटरी क्लब अकोला आणि राजीवजी मालीवाल परिवार यांच्या वतीने उचलण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना दर्जेदार नेत्रोपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.

विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
हे शिबिर दम्माणी नेत्र रुग्णालय (अकोला), रोटरी क्लब ऑफ अकोला, राजीवजी मालीवाल परिवार, भगवान कोटेश्वर मंदिर समिती (कुटासा), श्री आसरा मातादेवी देशभक्ती संघ संस्थान (चोहोट्टा बाजार) आणि युग मल्टीपर्पज फाऊंडेशन (अकोला) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अर्जुनसिंग विजयसिंग सोळंके, शाम गजानन राऊत, मोहनभाऊ कापले, मोहनभाऊ घुगरे, किरणभाऊ नवलकार, घनश्याम जोशी, हरीभाऊ बावने, प्रकाश रामाकडे, महादेव सोमकुवर, शेख मुरसलीम, बाळू गावंडे, कुशल भगत, उमेश थोटे, विलासभाऊ थोटे, महादेव सोळंके, रितेश सोळंके आदींनी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देतानाच गरजू रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात आल्याने या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. ३०० रुग्णांना मिळालेला लाभ आणि ७० रुग्णांच्या शस्त्रक्रियेची झालेली व्यवस्था यामुळे हे शिबिर परिसरातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरले.







Leave a Comment