रेल्वे स्थानकात खळबळ! विश्राम कक्षाजवळ महिलेची निर्घृण हत्या; बलात्कारानंतर दगडाने ठेचल्याची आरोपीची कबुली

रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाशिम रेल्वे स्थानकातील विश्राम कक्षाजवळ एका अज्ञात महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (९ जानेवारी) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी तपास केल्यानंतर ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

घटनास्थळी नेमकं काय आढळलं?

रेल्वे स्टेशन अधीक्षक कार्यालयाकडून माहिती मिळताच वाशिम शहर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. विश्राम कक्षाच्या समोर, संरक्षण भिंतीलगत अंदाजे ४५ ते ५० वर्षे वयोगटातील महिला अर्धनग्न अवस्थेत बेशुद्ध पडलेली दिसून आली. तिच्या कपाळावर आणि डोक्यावर गंभीर जखमा होत्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट दिसत होते.

घटनास्थळी तपास करताना पोलिसांना टोकदार दगड, पुरुषाचा बेल्ट, खाण्याचे साहित्य तसेच देशी व विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे प्रथमदर्शनीच हा प्रकार संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले.

सीसीटीव्ही तपासातून आरोपीपर्यंत पोलिस पोहोचले

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याआधारे संशयाची सुई एका व्यक्तीकडे वळली. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील अडुळा बाजार येथील संतोष रामराव खंडारे याला अकोला रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत धक्कादायक कबुली

पोलिस चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली. त्याने आधी महिलेवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केल्याचे मान्य केले. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

रेल्वे परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

रेल्वे स्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला असून, रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment