अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २१ एप्रिल :- अकोला लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे उभे असलेले डॉ. अभय काशिनाथ पाटील हे उच्चशिक्षित, वैद्यकीय तज्ञ आणि कर्तबगार शिलेदार असल्याचे प्रतिपादन करत, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे आणि माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी जठारपेठ आणि रामदासपेठ परिसरातील मतदारांना त्यांना मताधिक्य देण्याचे आवाहन केले. गुलाबराव गावंडे म्हणाले, “डॉ. अभय पाटील अकोला लोकसभा मतदारसंघासाठी सर्वोत्तम उमेदवार आहेत. त्यांना निवडून देऊन महानगरातील खोळंबलेल्या विकासाला नवी चालना देण्याची संधी मिळेल आणि आपण नवा इतिहास घडवू शकू.”
गजानन दाळू गुरुजींनी सांगितले की, “जठारपेठ आणि रामदासपेठ परिसरातील मतदार हे सुसंस्कृत आणि विकासाची जाणीव असलेले आहेत. त्यामुळे ते डॉ. अभय पाटील यांना मोठ्या बहुमताने निवडतील, कारण ते नव्या दमाचे आणि कल्पक विचारांचे आहेत.”
डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारसभेचे आयोजन माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी जठारपेठ परिसरातील दिवेकर वाचनालयात केले होते. निखिलेश दिवेकर म्हणाले, “हा परिसर माजी राज्यमंत्री अरुण दिवेकर यांच्या नावाने ओळखला जातो. त्यांनी येथे विकासकामे केली आणि कार्यक्षम कार्यपद्धती अवलंबली. अकोलेकर नागरिकांना त्यांच्या कार्याची जाणीव आहे. त्यामुळे डॉ. अभय पाटील यांना घराघरातून भरघोस मते मिळविण्यासाठी आम्ही शक्तीचे प्रयत्न करू.”
डॉ. अभय पाटील म्हणाले, “माझे विकासाचे धोरण स्पष्ट आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी तुमच्या सहकार्याची अपेक्षा करतो. एकत्र येऊन आपण अकोल्याचा विकास साधू शकतो आणि नवा इतिहास घडवू शकतो.”
या प्रचारसभेला माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, राष्ट्रवादीचे देवानंद टाले, दीपक ठाकूर, अजय चव्हाण, महादेव मोदगे, लहू रोडे, दिनेश खोब्रागडे, मिलिंद सातव, अमोघ कुलकर्णी, अमोल काळे आदी उपस्थित होते. संचालन कपिल रावदेव यांनी केले तर आभार मनीष मिश्रा यांनी मानले. सभेला जठारपेठ आणि रामदासपेठ परिसरातील मतदार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.