अकोला शहरात निवडणूक वातावरण तापत असताना भारतीय जनता पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सकारात्मक प्रचाराचा नवा मार्ग स्वीकारला आहे. कोणावरही टीका किंवा टिपण्णी न करता, केंद्र, राज्य आणि अकोला महानगरपालिकेतील विकासकामांचा लेखाजोखा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन , भाजपा प्रदेश सरचिटणीस व आमदार यांनी केले.
अकोला येथील भाजप कार्यालयात सोशल मीडिया कक्षाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्ष जयंत मसने होते. यावेळी गिरीश जोशी, ऋचा शहा, शिवा हिंगणे, यश सिकरीया, जितेंद्र देशमुख, ध्रुवखुणे, माधव मानकर, विवेक भरणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, त्रिबल इंजिन सरकार म्हणजे केंद्रातील , राज्यातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचे कार्य या तिन्हींच्या भरोशावरच आगामी निवडणुकीत भाजप यश मिळवेल. सोशल मीडियावरून होणाऱ्या अपप्रचाराला तथ्यपूर्ण आणि सभ्य पद्धतीने उत्तर देण्यासाठी २५ ते ४५ कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली असून, त्या टीमने कामालाही सुरुवात केली आहे.
महानगर अध्यक्ष जयंत मसने यांनी सांगितले की, राज राजेश्वर नगरीतील नागरिकांचे भाजपवर प्रेम आहे. त्या विश्वासाच्या बळावर आणि विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष नव्या वर्षात नागरिकांना विजयाची भेट देईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरातून भाजपने केलेल्या कामांची माहिती घराघरात पोहोचवणे हेच या कक्षाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





