WhatsApp

हिवरखेडमध्ये नायलॉन चायनीज मांजाविक्रीवर पोलिसांचा घणाघात; महिला आरोपी अटकेत, गुन्हा दाखल

Share

“निष्पाप जीवांचे गळे छाटणाऱ्या नायलॉन मांजाविरोधात अखेर पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. हिवरखेडमध्ये मृत्यूला आमंत्रण देणारी ही अवैध विक्री सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच पोलिसांनी थेट घरावर धाड टाकत कारवाई केली, आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली…”



हिवरखेड (जि. अकोला) पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधित नायलॉन चायनीज मांजाची अवैध विक्री करणाऱ्या महिला आरोपीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तिला अटक केली आहे. नागरिकांचा तसेच पशु-पक्ष्यांचा जीव धोक्यात येईल, याची पूर्ण जाणीव असूनही आर्थिक फायद्यासाठी नायलॉन मांजा विक्री केल्याप्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३९५/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन हिवरखेडचे कर्मचारी पॅट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे फिर्यादी पोलिस पथकाने दोन पंचांसह संभाजी नगर, हिवरखेड येथील आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकला. या कारवाईत महिला आरोपी नायलॉन चायनीज मांजा विक्रीसाठी साठवून ठेवताना आढळून आली. सदर मांजा वापरामुळे गंभीर दुखापत किंवा सदोष मनुष्यवध होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११०, २२३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे कलम ४, ५ व १५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले करीत आहेत.

Watch Ad

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट तसेच सहायक पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड, पोउनि गोपाल गिलबिले यांच्यासह पोहेकॉ गणेश साबळे, प्रफुल पवार, विजय सोळंके, रविंद्र रंधे, पोकॉ अमोल बुंदे तसेच महिला पोलिस कर्मचारी रेणुका पाबळे, अश्विनी करवते व खुशी धरमकर सहभागी होते.

नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांची पार्श्वभूमी लक्षात घेता, अवैध मांजाविक्रीविरोधातील पोलिसांची ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!