गेल्या वर्षभरापासून नोंदणी टपाल, कागदपत्रांची रजिस्टर, पुस्तकांची पार्सल्स मिळत नसल्याचे लक्षात येत होते. याबाबत येथील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. गाझी इबादुल्ला खान यांनी २२ डिसेंबर रोजी पोस्टमास्तरांकडे तक्रार दाखल केली. सुरुवातीला तक्रारीकडे दुर्लक्ष करत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मात्र प्रकरण तापू लागल्यानंतर पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना थेट पोस्टमन सतीश धुर्वे यांच्या घरी पाठवण्यात आले.
तेथे झालेल्या झडतीत जो प्रकार समोर आला, त्याने सर्वांनाच धक्का बसला. वाटप न केलेल्या टपालांची तब्बल तीन पोती घरात लपवून ठेवलेली आढळली. पोती उघडताच धक्क्यांची मालिका सुरू झाली. त्यामध्ये नागरिकांची आधारकार्ड, एटीएम कार्ड, वाहनपरवाने, नोकरीची कॉल लेटर्स, जीवन विमा पॉलिसी आणि विविध न्यायालयीन व शासकीय नोटिसा आढळून आल्या.

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर टपाल विभागात एकच खळबळ उडाली. प्रकरणाची गंभीर दखल घेत अंतर्गत मुख्य डाकघर अधीक्षक मोहन निकम (यवतमाळ) यांनी चौकशीचे आदेश दिले. वणी येथील उपविभागीय पोस्टमास्तर अशोक मुंडे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली असून अहवालही वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, याच काळात आणखी एक धक्कादायक तक्रार समोर आली आहे. पांढरकवड्यातील एचडीएफसी बँक कर्मचारी मनीष प्रधान यांनी सांगितले की, ७ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील बँक अधिकाऱ्यांकडे मौल्यवान वस्तू असलेले पार्सल स्पीड पोस्टने पाठवण्यात आले होते. नियमाप्रमाणे दुसऱ्याच दिवशी पार्सल पोहोचणे अपेक्षित होते. मात्र अडीच महिने उलटूनही ते पार्सल नागपूरला पोहोचले नाही. २४ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल करूनही त्यावर काय कारवाई झाली, याची साधी माहितीही पोस्टमास्तरांनी दिली नसल्याचा आरोप प्रधान यांनी केला आहे.
पोस्टमनवरचा विश्वास, पोस्ट खात्याची विश्वासार्हता आणि नागरिकांच्या वैयक्तिक सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.
‘मामाचं पत्र हरवलं… पण ते पोस्टमनच्या घरी सापडलं!’
अशी चर्चा आता पांढरकवड्यात उघडपणे होत असून, दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






