विदर्भाच्या मातीत पुन्हा एकदा माणुसकीचा खून झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडसूळ गावातून समोर आलेली ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर समाजाच्या तोंडावर जोरदार चपराक आहे. ज्या घरात संरक्षण मिळायला हवं, त्याच घरात एका १२ वर्षांच्या निष्पाप मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनी, काकाने आणि शेजारी राहणाऱ्या आजोबाने तब्बल सहा महिने अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
ही पीडिता अवघी १२ वर्षे ८ महिने २२ दिवसांची. वय शाळेत शिकण्याचं, स्वप्न पाहण्याचं. पण तिचं बालपण नराधमांनी हिरावून घेतलं. सहा महिन्यांपासून घरातील आणि ओळखीच्या व्यक्तींकडून होत असलेला त्रास अखेर असह्य झाला आणि धाडस दाखवत तिने आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे सत्य मांडलं.
योगायोगाने त्याच वेळी शाळेत चाईल्ड लाईनच्या महिला अधिकाऱ्यांचा समुपदेशन कार्यक्रम सुरू होता. मुख्याध्यापक गणेश ठाकरे आणि चाईल्ड लाईन पथकाने क्षणाचाही विलंब न करता थेट तेल्हारा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यामुळे एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा क्रमांक ३८२/२५ दाखल केला आहे. पीडितेचा जन्मदाता वडील आणि शेजारी राहणारा आजोबा गजानन भोम यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, तिसरा आरोपी असलेला काका सध्या फरार असून तो गेल्या २० दिवसांपासून पुण्यात असल्याची माहिती आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
मुलीने दिलेल्या जबाबानुसार, वडील आणि काकाकडून सातत्याने शोषण होत होतं, त्यानंतर शेजाऱ्यानेही अत्याचार केला. या घटनेने संपूर्ण अकोला जिल्हा हादरला आहे. शिक्षकांची सतर्कता आणि पोलिसांची तातडीची कारवाई नसती, तर हा गुन्हा अजूनही अंधारातच राहिला असता.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे करत असून, फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा केवळ गुन्हा नाही, तर समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारी भयावह वास्तवकथा आहे.






