नवीन वर्ष आणि नाताळच्या स्वागतासाठी राज्य सरकारने मद्यप्रेमींना दिलासा दिला आहे. या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दारूची दुकाने, पब आणि बार यांची वेळ वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, याबाबत गृह विभागाने अधिकृत आदेश जारी केले आहेत. मात्र, कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यास जिल्हाधिकाऱ्यांना ही परवानगी नाकारण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
सरकारी आदेशानुसार २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर या तीन दिवशी मद्यविक्रीसाठी विशेष सूट देण्यात आली आहे. या कालावधीत दारूची दुकाने रात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. बीअर आणि वाइन विकणाऱ्या दुकानांनाही मध्यरात्री १ वाजेपर्यंत विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. तसेच पब आणि बारना पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.
एफएल-३ (परवाना कक्ष) आणि एफएल-४ (क्लब अनुज्ञप्ती) परवाना असणाऱ्या ठिकाणांना, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रात्री १.३० ते पहाटे ५, तर आयुक्तालयाच्या बाहेरील भागात रात्री ११.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. नमुना ‘ई’ (बिअर बार) आणि ई-२ परवाना असणाऱ्यांना रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यविक्री करता येणार आहे.
दरम्यान, या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष गस्त, संशयित वाहनांची तपासणी, अनधिकृत ढाबे व फार्महाऊसवर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक विभागाकडून ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात विशेष मोहिम राबवली जाणार असून, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, महिलांशी गैरवर्तन, अनधिकृत मद्य व अंमली पदार्थ विक्री-सेवन यावर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे सरकारने सेलिब्रेशनसाठी वेळ वाढवली असली, तरी दुसरीकडे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.





