अकोल्याच्या राजकारणात आज एकच खळबळ उडाली आणि ती म्हणजे युतीच्या चर्चांना थेट ब्रेक लावणारी घोषणा. अनेक दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या वंचित–काँग्रेस युतीच्या चर्चांवर आज अधिकृत शिक्कामोर्तब झालं आणि तेही नकाराचं. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीने थेट भूमिका स्पष्ट करत राजकीय पटावर नवा ट्विस्ट दिला आहे. चर्चांवर चर्चा, अंदाजांवर अंदाज सुरू असतानाच वंचितने केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतूनही आपली दिशा स्पष्ट केली. पहिली उमेदवार यादी जाहीर करत वंचितने निवडणुकीचा नारळ फोडला आणि अकोल्यातील राजकीय गणित एकाच झटक्यात बदलून टाकलं.
राज्याच्या राजकारणात युतींच्या चर्चांना उधाण आलेलं असताना, अकोल्यातून आज एक निर्णायक आणि धक्कादायक घोषणा समोर आली. भाजप वगळता कोणत्याही पक्षासोबत युतीसाठी वंचित बहुजन आघाडी तयार असल्याची भूमिका यापूर्वी यांनी स्पष्ट केली होती. मात्र कोणालाही युतीसाठी डेडलाईन देता येणार नसल्याचंही त्यांनी ठामपणे नमूद केलं होतं.
या पार्श्वभूमीवर आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने मोठा राजकीय निर्णय जाहीर केला. आगामी महानगरपालिका निवडणुकीत ही सोबत जाणार नाही, अशी स्पष्ट घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे अकोल्यात वंचित–काँग्रेस युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसकडून कोणताही ठोस आणि ठराविक प्रस्ताव न आल्याने हा निर्णय घेतल्याचं वंचितने स्पष्ट केलं आहे.
तसेच भाजप आणि काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांसोबत युतीचे दरवाजे खुले असल्याचं वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं. म्हणजेच अकोल्यातील राजकीय गणित अजूनही पूर्णपणे उघडं असून, नवे समीकरण कधीही आकार घेऊ शकतात.
दरम्यान, केवळ घोषणा करून थांबण्याऐवजी वंचितने थेट कृतीतून आपली ताकद दाखवली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या प्रभागातून सर्वप्रथम वंचितने उमेदवार जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
उमेदवार जाहीर करून वंचितने निवडणुकीचा ‘नारळ फोडत’ थेट मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आता अकोल्यात ही लढाई फक्त पक्षांमध्ये न राहता, थेट राजकीय प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची ठरणार, हे मात्र नक्की.





