शहराच्या सत्तेसाठीची खरी लढाई आता कागदोपत्री सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीची लगबग अखेर उघडपणे मैदानात उतरली असून सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी प्रत्यक्ष अर्ज दाखल झाला नसला, तरी इच्छुकांनी तब्बल ५०८ अर्जांची उचल केल्याने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सत्ता, प्रतिष्ठा आणि भवितव्याच्या या लढाईत कोण टिकणार आणि कोण बाजूला पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महायुती आणि महाआघाडीचे चित्र अद्याप धूसरच असून, या अनिश्चिततेत इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी पक्ष कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी, नेत्यांचे उंबरठे झिजवणे, लॉबिंग आणि अंतर्गत गटबाजीला वेग आला आहे. एका-एका जागेसाठी १५ पेक्षा अधिक इच्छुक रांगेत असल्याने ही निवडणूक केवळ विरोधकांविरोधात नाही, तर पक्षांतर्गतच तीव्र स्पर्धेची ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
प्रमुख राजकीय पक्षांसह इतर पक्षांनीही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली असून, उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. काही पक्ष मात्र अद्याप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून, प्रतिस्पर्ध्यांच्या यादीकडे लक्ष ठेवून पुढची चाल ठरवण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होताच मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
तिकीट वाटपानंतर अंतर्गत नाराजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंडखोरी, पक्षांतर आणि अपक्ष उमेदवारी यामुळे निवडणूक रणांगण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
महापालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्याची प्रक्रिया न राहता, आता राजकीय नेतृत्वाची कसोटी ठरणार आहे. पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जांची उचल पाहता, ही लढाई सौम्य नव्हे तर थेट आणि निर्णायक ठरणार, हे स्पष्ट आहे.





