मराठी माणसाला अनेक वर्षांपासून ज्या ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर साकारला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत युती बुधवारी जाहीर झाली. मुंबईतील हॉटेल ब्ल्यू सी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आणि एकत्र व्यासपीठावर आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला.
युतीची घोषणा करताना राज ठाकरे यांनी आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. मराठी माणसाच्या हक्कासाठी, अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी हे एकत्र येणं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
“कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असं आपण पूर्वीच म्हटलं होतं, आणि तिथूनच या युतीची सुरुवात झाली, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही जोरदार टोला लगावला. “महाराष्ट्रात लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यात आणखी दोन टोळ्या अॅड झाल्या आहेत. त्या राजकीय पक्षांमधील मुलं पळवतात,” असा सूचक आणि बोचरा इशारा त्यांनी दिला.
जागावाटपाबाबत कोणतेही आकडे जाहीर न करता, निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून संयुक्त उमेदवारी दिली जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं. “आज फक्त एकच गोष्ट सांगायची होती… महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, ती शिवसेना–मनसे युती झाली आहे,” असा स्पष्ट संदेश राज ठाकरे यांनी दिला.
ही युती केवळ राजकीय गणित नसून, मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या राजकीय दिशेचा निर्णायक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये या युतीचा फटका कुणाला बसेल आणि मराठी मतदार कोणाच्या पाठीशी उभा राहील, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.





