WhatsApp

शंखनादात बहिरम यात्रेला सुरुवात! सातपुड्याच्या कुशीत लोकआस्थेचा महासागर; सव्वा महिना श्रद्धेचा जागर

Share

सातपुड्याच्या रांगांमध्ये वसलेल्या येथे पहाटेपासूनच भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम पाहायला मिळाला. श्री बहिरम बुवांची विधीवत होमपूजा, अभिषेक व अर्चना करून यात्रेला अधिकृत सुरुवात झाली. शेंदूर, दूध, दही, मध आणि लोण्याचा पंचामृत अभिषेक, त्यानंतर यज्ञात पूर्णाहुती व आरती असा भक्तिमय सोहळा पार पडला. संस्थान अध्यक्षांच्या हस्ते शंखनाद झाला, नारळ फुटला आणि बहिरम यात्रेचा उत्सव जल्लोषात सुरू झाला.



विदर्भापुरतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातून हजारो भाविक दरवर्षी बहिरम बुवांच्या दर्शनासाठी येथे येतात. सलग सव्वा महिना चालणारी ही यात्रा म्हणजे लोकदैवतावरच्या आस्थेचा जिवंत पुरावा आहे. दर्शनासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा, नवस फेडण्यासाठी आलेले कुटुंब, श्रद्धेने डोळे भरून येणारे भाविक — हे दृश्य म्हणजे बहिरम यात्रेची ओळख.

या यात्रेचा खास आकर्षण ठरते ते हंडीतील भाजी व रोडगे. वांग्याची भाजी आणि रोडगे हे बहिरम यात्रेचे सुप्रसिद्ध व्यंजन आहे. मांसाहारी भाविकांसाठी मटणाची स्वतंत्र हंडी असते. मातीच्या हंडीत शिजणाऱ्या मटणाचा स्वाद घेण्यासाठी भाविक खास आवर्जून येतात. यात्रेदरम्यान किमान चार लाखांहून अधिक नारळ येथे फुटतात, तर प्रसाद म्हणून मुरमुरे, रेवडी व फुटाणे दिले जातात.

सुमारे ३५० वर्षांहून अधिक इतिहास असलेले ‘बहिरमबुवा’ हे सातपुड्यातील लोकदैवत मानले जाते. जवळपास १२५ फूट उंचीवर असलेले मंदिर, शेजारी आठ ते दहा फूट उंच गणेशमूर्ती, बाहेर दगडी नंदी आणि दोन-अडीच एकरात पसरलेला मंदिर परिसर यात्रेचे वेगळेपण अधोरेखित करतो. मंदिराच्या खालच्या बाजूस सुमारे १०० एकर परिसरात यात्रा भरते. नागरिक लिलावाद्वारे जागा घेऊन राहुट्या उभारतात आणि हा परिसर सव्वा महिना जणू श्रद्धेच्या गावात रूपांतरित होतो.

Watch Ad

यात्रेदरम्यान महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा, तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तैनात आहेत. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी परिसरातील महिला मोठ्या संख्येने येथे पूजेसाठी येतात.

काळानुरूप यात्रेच्या स्वरूपात बदल झाले असले, तरी बहिरम बुवांवरील लोकांची निष्ठा, श्रद्धा आणि विश्वास आजही तितकाच अढळ आहे. सातपुड्याच्या कुशीत सुरू झालेली ही यात्रा केवळ धार्मिक उत्सव नसून, लोकसंस्कृतीचा, परंपरेचा आणि सामूहिक श्रद्धेचा भव्य सोहळा ठरत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!