कट्यार येथील आदिवासी समाजातील कुटुंबावर जातीवाचक शिवीगाळ, अश्लील अपमान व जीवे मारण्याच्या धमक्यांचा गंभीर प्रकार घडून दोन महिने उलटले तरीही आरोपींना अटक न झाल्याने न्याययंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या निष्क्रियतेविरोधात पीडित कुटुंबाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय उपोषण सुरू केले आहे.
ही घटना 5 ऑक्टोबर 2025 रोजी सार्वजनिक ठिकाणी घडली. पीडित राजू नारायण सोळंके (रा. कट्यार, ता. जि. अकोला) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून जातीवाचक शिवीगाळ, अश्लील अपमान तसेच गंभीर धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणी 6 ऑक्टोबर 2025 रोजी येथे FIR क्रमांक 317/2025 दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 अंतर्गत कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 3(5), 351(2), 352, 296 अशी अटकेस पात्र व गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. तरीही आरोपी संजय महादेव देवकार, प्रकाश महादेव देवकार व दीपक महादेव देवकार यांना अद्याप अटक झालेली नाही.
उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की आरोपी गावात मोकळेपणाने फिरत असून साक्षीदारांना धमकावणे, दबाव टाकणे व दहशत निर्माण करणे सुरू आहे. परिणामी पीडित कुटुंब आणि साक्षीदार भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा उद्देश तात्काळ कारवाई व पीडितांचे संरक्षण हा असताना तपासातील दिरंगाई अत्यंत चिंताजनक असल्याची भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
• FIR क्र. 317/2025 मधील सर्व आरोपींना तात्काळ अटक
• तपास निष्पक्ष व्हावा यासाठी तपास अधिकारी बदलणे किंवा विभागीय चौकशी
• पीडित कुटुंब व साक्षीदारांना संरक्षण
• साक्षीदारांना धमकावल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंद
• वरिष्ठ पातळीवर देखरेख ठेवून केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल
प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा ठाम पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.





