अकोला जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांनी जिल्ह्याच्या राजकारणाचे स्पष्ट चित्र समोर आणले आहे. मतमोजणीनंतर समोर आलेल्या निकालांनी अनेक पक्षांची स्वप्ने धुळीस मिळवली, तर काहींनी आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटांना जिल्ह्यात एकाही ठिकाणी नगराध्यक्षपदावर भोपळाही फोडता आला नाही.
जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून चार नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदावर कमळ फुलले आहे. तेल्हारा, अकोट, हिवरखेड आणि मूर्तिजापूरमध्ये भाजपने आपली पकड अधिक मजबूत केली. हिवरखेड नगरपालिकेत भाजपच्या सुलभा दुतोंडे यांनी तब्बल १,२४१ मतांनी विजय मिळवला. येथे २० पैकी ११ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, शिवसेना पाच, काँग्रेस दोन तर वंचित आणि एआयएमआयएमला प्रत्येकी एक जागा मिळाली.
तेल्हारा नगरपालिकेतही भाजपची सरशी ठळकपणे दिसून आली. वैशाली पालीवाल यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला १,२४२ मतांनी पराभूत केले. २० पैकी १३ जागांवर भाजपने विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले, तर उर्वरित जागांवर वंचित, शेतकरी आघाडी आणि अपक्षांनी आपली उपस्थिती नोंदवली.
अकोट नगरपालिकेत भाजप आणि एआयएमआयएम यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. येथे भाजपच्या माया धुळे यांनी ५,२७१ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. नगरसेवक पदाच्या ३५ जागांमध्ये भाजप सर्वाधिक ११ जागांवर विजयी ठरला असून, विविध पक्ष आणि अपक्षांना उर्वरित जागांवर संधी मिळाली.
मूर्तिजापूर नगरपालिकेत निवडणूक अक्षरशः थरारक ठरली. पहिल्या ११ फेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या वंचितला अखेरच्या फेरीत भाजपने मागे टाकले. हर्षल साबळे यांनी अवघ्या ७१८ मतांनी विजय मिळवत भाजपचे वर्चस्व कायम राखले. येथेही भाजप सर्वाधिक नगरसेवकांसह आघाडीवर आहे.
दरम्यान, बाळापूर नगरपालिकेत मात्र चित्र वेगळे दिसून आले. येथे काँग्रेसने सर्व अंदाज मोडीत काढत दबदबा कायम राखला. आफरीन परवीन मोहम्मद जमीर यांनी १,९२७ मतांनी विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले. या निकालामुळे माजी आमदार खतीब कुटुंबाच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.
बार्शीटाकळी नगरपंचायतीत पहिल्याच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने बाजी मारत राजकीय प्रवेशाची ठोस नोंद केली. अख्तर खातून अलीमोद्दीन यांच्या विजयाने वंचितचा झेंडा फडकला असून, येथे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.
एकूणच या निकालांनी अकोला जिल्ह्यातील राजकीय गणिते स्पष्ट केली आहेत. भाजपचा प्रभाव कायम असताना, बाळापूरमध्ये काँग्रेसची पुनरागमनाची ताकद दिसून आली, तर बार्शीटाकळीत वंचितने आपली उपस्थिती ठळक केली. आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा या निकालांवरच ठरणार, हे निश्चित.





