WhatsApp

काँग्रेसचा दणदणीत विजय, आफरीन परवीन नगराध्यक्षपदी विराजमान

Share

बाळापूर नगरपालिकेच्या निकालाने शहराच्या राजकारणात अक्षरशः भूकंप घडवून आणला आहे. अनेक अंदाज, समीकरणे आणि प्रतिष्ठेच्या लढती धुळीस मिळवत मतदारांनी थेट आपला कौल दिला आणि काँग्रेसच्या जोरदार पुनरागमनाने बाळापूरमध्ये पुन्हा एकदा सत्तेची सूत्रे जुन्याच हातात परत आली.



बाळापूर नगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शहराच्या सत्तेवर प्रभाव असलेल्या काँग्रेसने यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जबरदस्त पुनरागमन करत विरोधकांचे सर्व राजकीय गणित कोलमडून टाकले. नगराध्यक्षपदाच्या लढतीत आफरीन परवीन मोहम्मद जमीर यांनी तब्बल १,९२७ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत बाळापूरच्या राजकारणावर काँग्रेसचा झेंडा पुन्हा रोवला आहे.

या निवडणुकीकडे केवळ बाळापूरच नव्हे, तर संपूर्ण अकोला जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण ही निवडणूक केवळ नगराध्यक्षपदापुरती मर्यादित नव्हती, तर ती अनेक आजी–माजी आमदारांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरली होती. सुमारे ८० टक्के मुस्लिम लोकवस्ती असलेल्या बाळापूरमध्ये मुस्लिम मतांचा कौल निर्णायक ठरणार हे स्पष्ट होते. मुस्लिम उमेदवारांची संख्या अधिक असल्याने मतविभाजन होईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल, असे अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवले जात होते.

मात्र प्रत्यक्षात बाळापूरच्या मतदारांनी सर्व राजकीय भाकिते साफ फोल ठरवली. मतदारांनी कोणत्याही गोंधळाला बळी न पडता थेट काँग्रेसच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकले. या लढतीत उबाठाचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार व सध्या वंचित बहुजन आघाडीचे नेते नतिकोद्दीन खतीब, तसेच वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार व सध्या भाजपमध्ये असलेले बळीराम शिरस्कार हे तिन्ही दिग्गज आपल्या-आपल्या उमेदवारांसाठी मैदानात उतरले होते. मात्र तिन्ही बाजूंनी लावलेली राजकीय फिल्डिंग मतदारांनी एका झटक्यात मोडून काढली.

Watch Ad

हा निकाल केवळ विजयाचा नाही, तर बाळापूरच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरतो आहे. चार वर्षांपूर्वी सत्तेवरून खाली उतरलेली काँग्रेस पुन्हा ताकदीने सत्तेत परतली असून, शहराच्या विकासात आणि स्थानिक राजकारणात पुढील काळात काँग्रेसची भूमिका निर्णायक राहणार, हे या निकालाने स्पष्ट केले आहे. बाळापूरच्या मतदारांनी दिलेला हा कौल म्हणजे अनुभव, विश्वास आणि राजकीय परंपरेवर उमटवलेली ठाम मोहर असल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!