अकोटचा श्वास रोखून धरणारा रविवार आता उगवतोय. मतदानानंतर तब्बल वीस दिवसांपासून चाललेल्या राजकीय गणितांचा, अंदाजांचा आणि चर्चांचा पडदा अखेर २१ डिसेंबरला हटणार आहे. नगराध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि अकोटच्या सत्तेचा किल्ला कुणाच्या ताब्यात जाणार, याचा फैसला करणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण शहराची नजर खिळली आहे.
अकोट नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची घडी आता जवळ आली असून, रविवार २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. मतदानानंतर गेले तब्बल २० दिवस अकोटमध्ये दररोज राजकीय गणिते मांडली जात आहेत. नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि कोण नगरसेवक म्हणून विजयी ठरणार, याचा फैसला आता काही तासांतच होणार असल्याने शहरात प्रचंड उत्सुकता आणि धाकधूक पाहायला मिळत आहे.
मतदान टक्केवारीच्या आधारे विविध राजकीय पक्ष, आघाड्या आणि उमेदवारांचे समर्थक सोशल मीडियावर ‘गुलाल आमचाच’ अशा पोस्ट करत विजयाचे दावे करत आहेत. कोणत्या प्रभागात कोण निवडून येणार, नगराध्यक्ष कोण होणार, यावर कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत चर्चा रंगल्या असून काही ठिकाणी तर पैजाही लागल्या आहेत. मात्र निकालाची तारीख जवळ येत असताना उमेदवारांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि धाकधूक दोन्ही स्पष्टपणे दिसून येत आहेत.
दरम्यान, मतमोजणी रविवार २१ डिसेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातील ट्रायसेम सभागृहात होणार आहे. यामुळे अकोट ते पोपटखेड रस्त्यावर सर्वपक्षीय उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष वाहतूक नियोजन केले आहे.
सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अकोटकडून पोपटखेडकडे जाणाऱ्या वाहनांनी जुना बोर्डी रस्ता – ग्रामीण रुग्णालय मार्गाचा वापर करावा, तर पोपटखेडकडून अकोटकडे येणारी वाहने मोहाळा – अकोलखेड मार्गे अंजनगाव रस्त्याने यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.
प्रशासनाने मतमोजणीसाठी कडेकोट तयारी केली असून, सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण १४ टेबलवर मतमोजणी केली जाणार असून, यासाठी ७ फेऱ्या घेतल्या जातील. संपूर्ण प्रक्रियेसाठी १७४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोट नगर परिषदेचा निकाल केवळ स्थानिक राजकारणाचा फैसला न ठरता पुढील राजकीय समीकरणांना दिशा देणारा ठरणार असल्याने, २१ डिसेंबरचा दिवस अकोटसाठी निर्णायक ठरणार आहे. कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते, याची प्रतीक्षा आता अख्खं अकोट शहर श्वास रोखून करत आहे.





