WhatsApp

बाळापूरची लढाई मतांची की प्रतिष्ठेची? तीन आमदार, एक शहर, प्रश्न अनेक

Share

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळीने चांगलाच जोर धरला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून बाळापूर नगरपालिकेवर काँग्रेसच्या खतिब कुटुंबियांचा एकछत्री अंमल राहिला आहे. काही अपवाद वगळता जवळपास सहा दशकांहून अधिक काळ ही सत्ता टिकून राहिली. मात्र, मधल्या काळात या सत्तेला हादरा देत विरोधकांनी काही वर्षे सत्ता हिसकावून घेतली होती. आता पुन्हा एकदा ही निवडणूक केवळ नगरपालिकेपुरती मर्यादित न राहता बाळापूरच्या राजकीय भवितव्याची दिशा ठरवणारी ठरत आहे.



बाळापूर हे सुमारे ८० टक्के मुस्लिम लोकवस्ती असलेले, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. कधीकाळी विदर्भातील मोठ्या बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराच्या वैभवाची साक्ष आजही येथील किल्ला देतो. मात्र, दीर्घकाळ एकाच घराण्याची सत्ता राहिल्याने विकास प्रक्रियेत साचलेपण आले, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

या निवडणुकीत विशेष बाब म्हणजे, यापूर्वी आघाडी करून लढणारे अनेक पक्ष यंदा स्वबळावर मैदानात उतरले आहेत. त्यामुळे लढत अधिक चुरशीची बनली आहे. उबाठा शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या वंचित बहुजन आघाडीचे नेते नतिकोद्दीन खतिब, तसेच वंचितचे माजी आमदार व भाजपचे नेते बळीराम शिरस्कार या तिन्ही आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

1938 साली स्थापन झालेल्या बाळापूर नगरपरिषदेवर 1946 पासून बहुतांश काळ खतिब कुटुंबियांची सत्ता राहिली. यंदा मात्र समीकरणे बदलली आहेत. भाजप, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि एमआयएम यांनी स्वबळावर उमेदवार दिले आहेत. काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला उबाठा शिवसेनेचा पाठिंबा आहे. मुस्लिम-बहुल मतदारसंघात मुस्लिम उमेदवार अधिक असल्याने मतविभाजन होण्याची शक्यता असून, त्याचा फायदा कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Watch Ad

मतदानाचे आवाहन: शहराच्या भविष्यासाठी सजग नागरिक व्हा

बाळापूरच्या विकासाचा प्रश्न, घराणेशाही विरुद्ध परिवर्तन, पारंपरिक राजकारण विरुद्ध नव्या अपेक्षा, हे सर्व मुद्दे या निवडणुकीत केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे प्रत्येक मत अमूल्य आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, शांततेत आणि निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकशाहीत मतदार हाच खरा राजा असतो. बाळापूरच्या जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदान करून आपली भूमिका स्पष्ट करावी. शहराच्या विकासासाठी, पारदर्शक कारभारासाठी आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याकरिता मतदानाचा हक्क बजावणे हीच आजची खरी जबाबदारी आहे.
बाळापूर पुन्हा घराणेशाहीला कौल देतो की परिवर्तनाची हाक देतो, हे मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल. मात्र, तो निर्णय तुमच्या एका मतातूनच घडणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!