दिवस उजाडण्याआधीच धुराच्या लोटांनी शहराची शांतता भंग केली आणि नवीन वसाहती परिसरात एकच खळबळ उडाली. १९ डिसेंबर रोजी सकाळी बुलढाणा शहराला आगीची धक्कादायक बातमी जागी करून गेली. लहाने ले-आऊट नजीकच्या ‘चौपाटी’जवळ असलेल्या जगदेव बाहेकर व्यापार संकुलातील पर्वणी ड्राय फ्रुट या दुकानात अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार विद्युत शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच दुकानदार व नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवाने ही आग संकुलातील इतर दुकानांपर्यंत पोहोचली नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ बुलढाणा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन बंब काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानातील ड्राय फ्रुट, साहित्य, उपकरणे आणि फर्निचर पूर्णपणे जळून खाक झाले. सदर दुकानाचे मालक अनिरुद्ध जाधव असून, या आगीत किती आर्थिक नुकसान झाले याचा अंदाज अद्याप घेतला जात आहे.
भर चौकात असलेल्या व्यापार संकुलात आग लागल्याने परिसरात शेकडो नागरिकांची गर्दी जमली होती. चिखली राज्य मार्ग ते अजिंठा महामार्गाला जोडणाऱ्या सर्क्युलर रोडवर लहान-मोठी वाहने थांबल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करत नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली.
सकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेने बुलढाणा शहराच्या सुरक्षेचा आणि व्यापारी संकुलांमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. प्रशासनाने अशा ठिकाणी विद्युत यंत्रणांची तपासणी आणि सुरक्षेचे उपाय अधिक कडक करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





