शासनाने बंदी घातलेला गुटखा पुन्हा एकदा पोलिसांच्या नजरेतून सुटतोय, असा समज करून घेतलेल्या तस्करांना चोहट्टा बाजारात जोरदार धक्का बसला. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या नाकाबंदीत पोलिसांनी दुचाकीवरून गुटखा घेऊन येणाऱ्या इसमाला रंगेहात पकडत, आरोग्याशी खेळणाऱ्या काळ्या धंद्यावर थेट घाव घातला.
चोहट्टा बाजार परिसरात पोलिसांनी केलेल्या ठोस कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी नेत असलेल्या एका इसमाला रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईत ४२ हजारांहून अधिक किमतीचा गुटखा आणि दुचाकीसह एकूण १ लाख ७ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
गुटखा बंदी फक्त कागदावरच नाही, तर रस्त्यावरही अंमलात आणली जाणार, असा थेट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.
दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी चोहट्टा बाजार येथे दहिहांडा पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली होती की, ग्राम करतवाडी येथून एक इसम मोटरसायकलवरून प्रतिबंधित गुटखा घेऊन चोहट्टा बाजारकडे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोहट्टा बाजार ते करतवाडी रोडवरील टिपू सुलतान चौकात नाकाबंदी करून सापळा रचला.
नाकाबंदी दरम्यान काळ्या रंगाची, निळ्या-पांढऱ्या पट्ट्यांची यामाहा कंपनीची दुचाकी (MH 30 W 5575) संशयास्पद अवस्थेत येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवून चालकाचे नाव विचारले असता त्याने आपले नाव शाम भास्कर सुरतकार (वय ३५, रा. रेल, ता. अकोट, जि. अकोला) असे सांगितले.
दुचाकीवर ठेवलेल्या पांढऱ्या पोतड्याबाबत विचारणा केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला.
पंचासमक्ष तपासणी केली असता पोतड्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा आढळून आला. या कारवाईत ४२,३४० रुपयांचा गुटखा तसेच ६५,००० रुपये किमतीची दुचाकी असा एकूण १,०७,३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारा व शासनाने बंदी घातलेला गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरोधात पोलीस स्टेशन दहिहांडा, जि. अकोला येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले, पोलीस उपनिरीक्षक संजय इंगळे, बिट जमादार, पोहेकॉ रविराज डाबेराव, पो.कॉ. स्वप्निल खडे आणि पो.कॉ. प्रमोद दळवी यांनी सहभाग घेतला.
चोहट्टा परिसरात गुटखा विक्रीविरोधात पोलिसांनी घेतलेली ही कठोर भूमिका आरोग्याशी खेळणाऱ्यांसाठी स्पष्ट इशारा ठरत असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा संदेश पोलिसांनी दिला आहे.






