WhatsApp

महापालिका रणधुमाळीत ‘ठाकरे ब्रँड’ एकत्र! विदर्भात शिवसेना–मनसे युतीचा विस्तार; नागपूरसह अकोला, अमरावती, चंद्रपूरमध्ये संयुक्त लढत

Share

मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच ठाकरे बंधूंच्या युतीबाबत एक मोठी आणि निर्णायक घडामोड समोर आली आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकनंतर आता विदर्भातील चार महापालिकांमध्येही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे (राज ठाकरे) एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.



विदर्भात ठाकरे बंधूंची युती निश्चित?

नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या चार महापालिकांमध्ये शिवसेना–मनसे युती होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे राज्यातील एकूण आठ महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या घडामोडीमुळे महापालिका निवडणुकांआधीच राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

मनसेकडून अधिकृत संकेत

नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली.
विदर्भातील चारही महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मनसे एकत्र निवडणूक लढवणार आहे. विदर्भात ठाकरे ब्रँड एकत्र येत असून याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसेल. आम्हाला मोठे यश मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अकोल्यात हालचालींना वेग

राजू उंबरकर हे अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. तसेच अकोला महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
या हालचालींवरून विदर्भात मनसे–शिवसेना युतीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Watch Ad

भाजपच्या बालेकिल्ल्याकडे लक्ष

आधीच मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे संकेत होते. त्यात आता विदर्भातील चार महापालिकांची भर पडल्याने राज्याच्या राजकारणात ‘ठाकरे ब्रँड’ पुन्हा एकदा ताकदीने उभा राहत असल्याचे चित्र आहे.
विशेषतः भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये ही युती किती प्रभाव टाकते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीत मोठा ट्विस्ट?

महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना–मनसे युतीचा हा विस्तार राजकीय समीकरणे बदलणारा ठरू शकतो. येत्या काही दिवसांत जागावाटप, प्रचाराची दिशा आणि संयुक्त रणनीती याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
ठाकरे बंधूंची ही युती निवडणूक रणधुमाळीत किती मोठा प्रभाव पाडते आणि ‘ठाकरे ब्रँड’ला पुन्हा सत्ता काबीज करता येते का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!