आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) स्वबळावर लढणार असून महानगरपालिकेच्या सर्वच प्रभागांत उमेदवार उभे करणार असल्याची स्पष्ट घोषणा आज करण्यात आली. अकोला महानगर अध्यक्ष मसुद अहमद खान यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर तीव्र टीका करत, त्यांच्या साट्यालोट्यामुळे शहरात मूलभूत समस्यांचा डोंगर उभा राहिल्याचा आरोप केला.
मसुद अहमद खान म्हणाले की, अकोला शहर सध्या भ्रष्टाचाराच्या अजगरी विळख्यात अडकले असून मनपात ‘कमिशनर राज’ हावी झाले आहे. दिल्ली व पंजाबमध्ये राबवलेल्या विकास मॉडेलच्या धर्तीवर अकोल्यातही स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन उभे करण्याचा आम आदमी पार्टीचा निर्धार आहे.
अकोल्यासाठी ‘आप’ची विकास ग्वाही
आम आदमी पार्टीने शहरातील नागरिकांसाठी अनेक ठोस आश्वासने जाहीर केली आहेत.
भाजप–काँग्रेसच्या साठगाठीतून लादलेले भरमसाठ महापालिका कर रद्द करून कमी दरात नवीन करप्रणाली लागू केली जाईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रात दर्जेदार शैक्षणिक व्यवस्था उभी केली जाईल.
आरोग्य सेवांसाठी प्रत्येक प्रभागात ओपीडी हॉस्पिटलची उभारणी करण्यात येईल.
पाणी व स्वच्छतेच्या बाबतीत दररोज शुद्ध पाणीपुरवठा, शहराचे सौंदर्यीकरण आणि नियमित साफसफाई केली जाईल.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येईल.
याशिवाय प्रत्येक प्रभागात जिमची स्थापना, नागरिकांसाठी हेल्पलाईन सेंटर, तसेच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा शब्द देण्यात आला आहे.
भाजप–काँग्रेसवर जोरदार हल्ला
नगर परिषदेच्या काळात स्थापन झालेल्या शाळांची आज दयनीय अवस्था झाली आहे. शहरात कचऱ्याचे ढीग, रस्त्यांवर दिव्यांचा अभाव, डुकरं व भटक्या कुत्र्यांचा त्रास, वाढत्या आरोग्य समस्या याला भाजप व काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप मसुद अहमद खान यांनी केला.
इच्छुक उमेदवारांना आवाहन
दिल्ली–पंजाब मॉडेल अकोल्यात राबवून जागतिक दर्जाच्या सुविधा, शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी आणि रस्त्यांची हमी देत आम आदमी पार्टी सर्व प्रभागांत निवडणूक लढवणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले असून उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वसंतराव ढोके, राज्य कार्यकारिणी सहसचिव अरविंद कांबळे, ज्ञानेश्वर साकरकर, जिल्हाध्यक्ष कैलाश प्रांजळे, प्रा. विजय ठाकरे, गजानन बडकले, प्रा. प्रदीप गवई, आकीब खान, अरुण शेगोकार, श्रावण रंगारी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






