अकोट ग्रामीण पोलीसांनी गाजीपूर शेतशिवारात अवैध डिझेल विक्री करणाऱ्यावर कारवाई केली असून २५ लिटर डिझेलसह मुद्देमाल जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आज दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध इंधन विक्रीविरोधात महत्त्वाची कारवाई केली आहे. पोलीस स्टेशनमध्ये हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गाजीपूर शेतशिवार परिसरात खदानमधील टीपर आणि ट्रक चालकांना विनापरवाना डिझेलची विक्री केली जात आहे.
या खात्रीलायक माहितीनंतर पोलीसांनी तात्काळ दोन पंचांसह कारवाई करत गाजीपूर शेतशिवारातील दयाराम चैतराम तोटे यांच्या शेतात, पळसाच्या झाडाजवळ संशयित इसमाला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष चौकशी केली असता सदर इसमाने आपले नाव नागोराव पांडुरंग काळे, वय ३८ वर्ष, रा. वांगरगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला असे सांगितले.
तपासादरम्यान त्याच्या ताब्यात पांढऱ्या व लाल रंगाच्या झाकणाची अंदाजे २५ लिटर क्षमतेची प्लास्टिक कॅन आढळून आली. चौकशी केली असता कॅनमध्ये डिझेल असल्याचे त्याने कबूल केले. तसेच डिझेल साठवणूक किंवा विक्रीसाठी कोणताही परवाना नसल्याचेही त्याने पंचांसमक्ष मान्य केले.
पोलीसांनी सदर २५ लिटर डिझेल, अंदाजे किंमत २,५०० रुपये, तसेच आरोपीकडील मोटोरोला कंपनीचा सिल्वर रंगाचा मोबाईल, किंमत अंदाजे १०,००० रुपये, असा एकूण १२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी. रेड्डी आणि सहायक पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर मुनघरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत पोउपनि मिनाक्षी काटोले, पोहेकॉ हरिष सोनवणे, विठ्ठल चव्हाण आणि पोका शैलेश जाधव यांनी सहभाग घेतला.
अवैध इंधन विक्रीमुळे शासनाचा महसूल बुडत असून अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.






