WhatsApp

लग्नाच्या नावाखाली लूट आणि अपहरणाचा थरारनवरीसह ‘फसवे लग्न’ टोळीचा वाशिम पोलिसांकडून पर्दाफाश

Share

वाशिम जिल्ह्यात लग्नाच्या नावाखाली घरातील सोनं-नाणं लुटून नवरीसह पसार होणाऱ्या टोळीचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात केवळ फसवणूकच नव्हे, तर सशस्त्र धुडगूस, दरोडा आणि थेट नवरदेवाच्या वडिलांचे अपहरण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. वाशिम पोलिसांनी नवरीसह पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, या गुन्ह्यात एकूण १३ आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे. तपास सुरू असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.



वाशिम पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील एका तरुणाचे लग्न जमत नसल्याने त्याने लग्न जुळवून देणाऱ्या एजंटशी संपर्क साधला. या एजंटने नाशिक येथील एका मुलीसोबत लग्न जुळवून दिले. ११ डिसेंबर रोजी एका मंदिरात विवाहसोहळा पार पडला आणि सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र होते.

मात्र, लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांतच या कथेला वेगळेच वळण मिळाले. मुलीच्या माहेरकडून दोन व्यक्ती नववधूला घेण्यासाठी आसेगाव पेन येथे आल्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने नवरदेवाच्या कुटुंबीयांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या दोघांनी तेथून पलायन केले. याच क्षणी आपली फसवणूक उघडकीस येईल, हे लक्षात येताच या टोळीने थेट आक्रमक पवित्रा घेतला.

त्या रात्री तीन वाहनांतून सशस्त्र टोळके नवरदेवाच्या घरी धडकले. त्यांनी नवरदेवाची विचारपूस केली. तो घरी नसल्याचे समजताच, टोळीने घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. आवाज ऐकून शेजारी जमा झाले असता, त्यांनाही धमकावण्यात आले. परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

Watch Ad

इतक्यावरच न थांबता, ही टोळी नववधूच्या शोधात नवरदेवाच्या मामाचे घर असलेल्या वाशिम तालुक्यातील मोहजा गावाकडे रवाना झाली. तेथे पोहोचताच त्यांनी घरातील साहित्य, दुचाकींची नासधूस केली. मात्र, तिथेही नववधू आढळून आली नाही. यानंतर टोळीने कळस गाठत नवरदेवाच्या वडिलांचे थेट अपहरण केले. त्यांना जबरदस्तीने गाडीत टाकून टोळीने गावातून पलायन केले.

या अपहरणानंतरही टोळीची गुन्हेगारी थांबली नाही. जालनाकडे जात असताना, या टोळीतील काही सदस्यांनी एका खाजगी वाहनाला अडवून चालकास बेदम मारहाण केली आणि पैशांची लूट केली. या एकामागोमाग एक घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी तातडीने तीन विशेष पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि समन्वयाच्या जोरावर पोलिसांनी या टोळीचा माग काढला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राहुल दिलीप मस्के (वय ३२, रा. नागेवाडी, जि. जालना) आणि सतीश विनायक जाधव (वय २९, रा. जालना) यांना अहिल्यानगर येथून ताब्यात घेण्यात आले. आकाश छगन गायकवाड याला जालना येथून अटक करण्यात आली. तसेच नवरी मुलगी आणि लग्न जुळवून देणारा एजंट शांताराम कडूजी खराटे (रा. मोहजा) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या सर्व आरोपींविरोधात फसवणूक, दरोडा, अपहरण आणि धमकी अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासात या टोळीने याआधीही अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

लग्नासारख्या पवित्र नात्याचा गैरवापर करून गुन्हेगारी करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश ही वाशिम पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे. नागरिकांनी लग्न जुळवून देणाऱ्या एजंट्सबाबत योग्य पडताळणी करावी आणि संशयास्पद बाबी तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!