WhatsApp

१२ वर्षांचा फरार अखेर जेरबंद!मेळघाट वाघ शिकार प्रकरणातील शिकारीला मध्यप्रदेशातून अटक

Share

मेळघाट व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत २०१३ साली उघडकीस आलेल्या वाघांच्या शिकार प्रकरणात तब्बल १२ वर्षांपासून फरार असलेल्या शिकारीला अखेर अटक करण्यात वनविभागाला यश आले आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा, मेळघाट व्याघ्रप्रकल्प आणि अकोट वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली असून, वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने ही अटक अत्यंत निर्णायक मानली जात आहे.



अटक करण्यात आलेली आरोपी शीतलाबाई उर्फ गजेंद्रीबाई हिचा शोध घेऊन तिला मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. ती २०१३ मधील वाघ शिकार प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक असून, अकोट वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या या गंभीर गुन्ह्यानंतर ती फरार होती.

२०१३ साली मेळघाट व्याघ्रप्रकल्प परिसरात वाघांच्या शिकारीचे मोठे जाळे उघडकीस आले होते. त्या काळात मेळघाट वनविभागाने अत्यंत प्रभावी तपास करत शेकडो आरोपींना अटक केली होती आणि अनेकांना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. याच प्रकरणातून फरार असलेली शीतलाबाई अनेक वर्षांपासून पोलिस आणि वनविभागाला हुलकावणी देत होती.

या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात तत्कालीन वनाधिकारी विशाल माळी यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या मेळघाट वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने मोलाची भूमिका बजावली. ही शाखा आजही वाघ शिकार आणि वन्यजीव गुन्ह्यांविरोधात प्रभावीपणे कार्यरत असून, दोन वर्षांपूर्वी याच शाखेने या प्रकरणातील आणखी एका शिकाऱ्याला अटक केली होती. त्या आरोपीविरोधातील आरोप न्यायालयात सिद्ध झाले होते.

Watch Ad

सध्याच्या कारवाईत वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी गणेश टेकाळे असून, ही संपूर्ण कारवाई मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रसंचालक व वनसंरक्षक आदर्श रेड्डी तसेच अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक राहुल टोलिया यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

या मोहिमेत वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेतील विशाल बन्सोड, स्वप्नील राऊत, दिनेश केंद्रे, विशाल उमाटे, अनंता नायसे आणि विशाल सुरत्ने यांनी विशेष मेहनत घेतली. आरोपीला अटक केल्यानंतर तिला अकोट प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रथम तीन दिवसांची वनकोठडी मंजूर केली होती. त्यानंतर आरोपीला २६ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दीर्घकाळ फरार असलेल्या शिकाऱ्याला अटक होणे ही केवळ एक कायदेशीर कारवाई नसून, वन्यजीव संरक्षणासाठी मोठा संदेश देणारी कारवाई असल्याचे मानले जात आहे. या अटकेमुळे वाघ शिकार आणि वन्यजीव गुन्ह्यांविरोधातील कारवाईला अधिक बळ मिळाले असून, भविष्यात अशाच संयुक्त व कठोर कारवाया अधिक तीव्रतेने राबवण्यात येतील, असे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!