डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून बारावीपासून जीव तोड मेहनत करणारी, आई-वडिलांची एकुलती एक आशा असलेली लेक… आणि क्षणात सगळं संपलं. मंगळवारी झालेल्या एका भीषण अपघातात ऋतुजा गणेश सावळे (वय १९, रा. डोंगरशेवली, ता. चिखली, जि. बुलढाणा) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सावळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण डोंगरशेवली गाव आणि महाविद्यालयावर शोककळा पसरली आहे.
ऋतुजा ही बुलढाणा येथील राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. मंगळवारी नेहमीप्रमाणे ती दुचाकीने कॉलेजकडे निघाली होती. एसटी बसच्या बाजूने ती आपली गाडी चालवत असताना, समोरून येणाऱ्या एका दुचाकीने तिला जोरदार धडक दिली. धडकेनंतर तोल गेल्याने ऋतुजाचं डोकं एसटी बसला धडकून ती रस्त्यावर कोसळली आणि गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. ही बातमी कळताच कुटुंबीयांवर आघात झाला. ज्या लेकीला डॉक्टर म्हणून पाहण्याचं स्वप्न आई-वडिलांनी पाहिलं होतं, ते स्वप्न अपघाताने अर्ध्यावरच राहिलं.
ऋतुजाने डॉक्टर होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. तिचे वडील गणेश सावळे यांनीही मुलीच्या शिक्षणासाठी कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. गरज पडल्यास परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याची तयारीही त्यांनी ठेवली होती. ऋतुजा एमबीबीएससाठीही पात्र झाली होती, अशी माहिती समोर येत आहे. आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर घरात आणि नातेवाईकांत आनंदाचं वातावरण होतं.
मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. कॉलेजसाठी निघालेली ऋतुजा गावापासून काही अंतरावरच काळाच्या झडपेत सापडली. तिच्या अकाली जाण्याने महाविद्यालयीन सहकारी, प्राध्यापक, मित्रमंडळी आणि संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एक उज्वल भविष्य, एक स्वप्न आणि एक कुटुंबाची आशा…
या अपघाताने सगळं हिरावून घेतलं.





