आई स्वर्गापेक्षा महान असल्याचे सांगणारी ही उक्ती असताना, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे घडलेल्या एका घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. पैशांच्या मोहापायी एका मुलाने आपल्या वयोवृद्ध आईला जिवंतपणीच ‘मृत’ ठरवत तिचे सर्वस्व हिरावून घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
ही करुण कथा आहे जळगाव जामोद येथील बहेरील पुरा परिसरात राहणाऱ्या कौशल्याबाई कमालसिंग राजपूत यांची. आयुष्यभर कष्ट करून स्वतःचे घर विकून त्यांनी बँकेत दहा लाख रुपयांची मुदत ठेव केली होती, जेणेकरून उतारवयात आधार मिळावा. मात्र, त्यांच्याच मुलाने प्रेमसिंग राजपूत याने पैशांच्या लालसेपोटी आईवरच घात केला.
प्रेमसिंग राजपूत याने स्वयंघोषित घोषणापत्राच्या आधारे जिवंत असलेल्या आईचा मृत्यू झाल्याची खोटी नोंद जळगाव जामोद नगरपरिषदेत करून घेतली. धक्कादायक बाब म्हणजे, नगरपरिषदेने कोणतीही शहानिशा न करता थेट मृत्यू प्रमाणपत्र जारी केले. या बनावट मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे प्रेमसिंगने आईच्या बँक खात्यातील दहा लाख रुपये काढून घेतले आणि गावातून फरार झाला.
आपण जिवंत असताना स्वतःच्या मृत्यूचे प्रमाणपत्र काढले गेले आहे, ही बाब जेव्हा कौशल्याबाईंना समजली तेव्हा त्यांना जबर धक्का बसला. बँकेत चौकशी केली असता खात्यातील सर्व रक्कम मुलाने काढून नेल्याचे स्पष्ट झाले. त्या क्षणी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आज ही वृद्ध माता एकटीच, निराधार अवस्थेत जीवन जगत असून, “मी जिवंत आहे” हे सिद्ध करण्यासाठी पोलीस ठाणे, नगरपरिषद आणि विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे.
कौशल्याबाईंनी दोन महिन्यांपूर्वी पोलिसांकडे तक्रार दिली असली, तरी सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जळगाव जामोद पोलिसांनी प्रेमसिंग राजपूत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, बनावट मृत्यू प्रमाणपत्रही रद्द करण्यात आले आहे. तरीही आरोपी अद्याप फरार असल्याने कौशल्याबाईंना न्याय मिळेल का, हा प्रश्न कायम आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोणतीही तपासणी न करता जिवंत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र कसे दिले गेले, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
आईला देव मानणाऱ्या समाजात, मुलाकडूनच आईवर असा घात होणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. आज कौशल्याबाई न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. माणुसकी जिवंत आहे की नाही, याची परीक्षा घेणारी ही घटना असून, प्रशासन आणि समाज दोघांनीही या प्रकरणात संवेदनशीलतेने भूमिका घेण्याची गरज आहे.





