विज्ञानवेध उपक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यातील ३० बालवैज्ञानिक विद्यार्थ्यांचा सात दिवसांचा इस्रो अभ्यास दौरा आज उत्साहात सुरू झाला. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हिरवी झेंडी दाखवत या शैक्षणिक दौऱ्याला अधिकृत शुभारंभ केला. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
१५ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थी विमानाने बेंगळुरूला जाणार असून, त्यानंतर श्रीहरीकोटा येथील इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ला भेट देणार आहेत. यासोबतच मैसूर पॅलेस, हैद्राबाद येथील सालारजंग म्युझियम, गोवळकोंडा किल्ला, रामोजी फिल्म सिटी तसेच इतर ऐतिहासिक व शैक्षणिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानासोबतच इतिहास आणि संस्कृती जाणून घेण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे. अंतराळ विज्ञान, संशोधन प्रक्रिया, उपग्रह तंत्रज्ञान याबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक बळावणार असल्याचे मत शिक्षण विभागाने व्यक्त केले.
इस्रो वारीसाठी विद्यार्थी रवाना होत असताना त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, भविष्यातील शास्त्रज्ञ घडवण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.






