WhatsApp

दाट धुक्यात मृत्यूचा सापळा! यमुना एक्स्प्रेसवेवर 11 वाहनांची भीषण धडक, बसला आग; 4 ठार, 25 जखमी

Share

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात आज पहाटे यमुना एक्स्प्रेसवेवर थरारक अपघात घडला. आग्रा ते नोएडा दिशेने जाणाऱ्या 8 बस आणि 3 कार दाट धुक्यामुळे एकमेकांवर आदळल्या. ही धडक इतकी भीषण होती की, काही क्षणांतच वाहनांनी पेट घेतला आणि घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.



या भीषण अपघातात 4 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला असून 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही दुर्घटना आग्रा–नोएडा यमुना एक्स्प्रेसवेवरील बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत, खडेहरा गावाजवळ माईल स्टोन क्रमांक 127 जवळ घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पहाटेच्या वेळी धुके इतके दाट होते की काहीच दिसत नव्हते. याच कारणामुळे एकामागोमाग एक वाहनं धडकली. अपघातानंतर काही प्रवाशांनी बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला, तर काही दुर्दैवी प्रवासी वाहनांमध्येच अडकले. आगीमुळे आत अडकलेल्या प्रवाशांचा जळून मृत्यू झाला.

Watch Ad

अपघातातून बचावलेला कानपूर येथील सौरभ सांगतो की, “समोर काहीच दिसत नव्हतं. अचानक जोराची धडक झाली आणि काही क्षणांत बसने आग घेतली. जीव वाचवण्यासाठी उडी मारावी लागली.”

दरम्यान, मथुरेचे जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, या अपघातात बस आणि कारच्या टक्करमुळे आग लागली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

अपघातानंतर अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचवण्यासाठी प्रशासनाने पर्यायी वाहनांची व्यवस्था केली आहे. दाट धुक्यामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका लक्षात घेता, वाहनचालकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यमुना एक्स्प्रेसवेवरील हा अपघात पुन्हा एकदा दाट धुक्यातील प्रवास किती धोकादायक आहे, याची जाणीव करून देणारा ठरला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!