अकोला महानगरपालिकेची निवडणूक होत असून, या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. गेल्या अनेक वर्षांत महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात होता. लोकप्रतिनिधी नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले, तर नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या. आता हीच जनता थेट मतदानातून आपला कौल देणार असून, १६ जानेवारी रोजी खरा धुरंधर कोण हे स्पष्ट होणार आहे.
१५ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीची घोषणा करताच अकोला महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष आणि स्थानिक नेते मैदानात उतरू लागले असून, प्रत्येक प्रभागात निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्यानंतर अवघ्याच एका दिवसात म्हणजे १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीत अनेक मुद्दे केंद्रस्थानी राहणार आहेत. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा, स्वच्छतेचा अभाव, वाढते अतिक्रमण, कर आकारणीतील त्रुटी आणि रखडलेली विकासकामे यावर उमेदवारांना उत्तर द्यावे लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांत हे प्रश्न सुटले नाहीत, ही नाराजी अनेक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ पक्षीय नसून कामगिरीवर आधारित ठरण्याची शक्यता आहे.
नेते मोठमोठ्या घोषणा करतील, विकासाची स्वप्न दाखवली जातील आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही होतील. मात्र शेवटी कोणाच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा, हा निर्णय मतदारच घेणार आहे. यंदाच्या निवडणुकीत काही जुने चेहरे पुन्हा जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतील, तर काही नवे चेहरे संधी साधून राजकारणात आपली जागा निर्माण करू पाहतील.
शहरातील प्रत्येक प्रभागात सध्या एकच चर्चा सुरू आहे, खरंच काम करणारा नेता कोण, फक्त आश्वासन देणारा कोण आणि यावेळी बदल हवा की पुन्हा संधी द्यावी? या प्रश्नांची उत्तरं १६ जानेवारीला मतमोजणीच्या दिवशी मिळणार आहेत.
तोपर्यंत अकोला महापालिकेचं रणांगण तापलेलं राहणार आहे. अखेर या निवडणुकीत खरा धुरंधर कोण ठरेल, नेता की जनता, याचा फैसला अवघा अकोला करणार आहे.





