WhatsApp

Vidarbha road accidents विदर्भात अपघातांचा कहर: मजूरांचा मृत्यू, घाटात ड्रायव्हरचा अंत… रस्ते झाले मृत्यूचे सापळे?

Share

विदर्भाच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांत घडलेल्या सलग अपघातांनी संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अकोला, अकोट, अमरावती आणि चिखलदरा या ठिकाणी वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू, गंभीर जखमी आणि मोठे आर्थिक नुकसान झाले असून रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.



कापूस वेचणीवरून परतताना काळाचा घाला

अकोला शिवारात कापूस वेचणीसाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून आलेले मजूर आपातापा परिसरात वास्तव्यास होते. शनिवारी दिवसभर काम आटोपून रात्री सर्व मजूर एका वाहनाने घरी परतत असताना घुसरनजीक विद्युत कंपनीच्या पॉवर हाऊससमोर चालकाचे नियंत्रण सुटले. वाहन रस्त्याच्या कडेला उलटले आणि क्षणात आनंदाचे घर दुःखात बदलले. या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ११ मजूर गंभीर जखमी झाले.

अकोट–अकोला मार्गावर रक्तरंजित धडक

रविवार सायंकाळी अकोट–अकोला मार्गावरील पहेलवान बाबा मंदिराजवळ शेगावहून अकोटकडे जाणारी चारचाकी आणि समोरून येणारी दुचाकी यांची जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून इतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मद्यधुंद वेगाचा कहर, कार थेट घरात

अकोला शहरातील जुन्या RTO रोडवर शनिवारी रात्री तुफान वेगातील कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट घरात घुसून पलटी झाली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी घराचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक तपासात चालक मद्यधुंद असल्याचे समोर आले असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

Watch Ad

दर्यापूरमध्ये आगीने गिळले वाहन

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरच्या रामतीर्थ फाटा जवळ रविवारी संध्याकाळी एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता असून वाहन पूर्णतः जळून खाक झाले. चालक वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

चिखलदरा घाटात चालकाचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा घाटात उभी असलेली ट्रॅव्हलर बस उतारावर दरीत जात असताना गाडी अडवण्याच्या प्रयत्नात चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने घाट परिसरातील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

रस्ते सुरक्षित कधी होणार?

एकामागोमाग एक घडणाऱ्या या घटनांनी रस्त्यांवरील बेदरकार वाहनचालक, मद्यधुंद ड्रायव्हिंग आणि ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेचे भयावह चित्र समोर आले आहे. प्रशासन आणि वाहतूक यंत्रणांनी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!