शहरातील गीता नगर परिसरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने केलेल्या आत्महत्येने सर्वदूर हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचे पडसाद आता थेट नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. मुख्य प्रतोद आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी आज १० डिसेंबरला ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे हा गंभीर मुद्दा सभागृहात मांडला.
आमदार सावरकर यांनी सांगितले की, पीडित मुलीला गेल्या सहा महिन्यांपासून एका विशिष्ट समाजातील व्यक्तीकडून सतत मानसिक छळ सहन करावा लागत होता. मुलीच्या वडिलांनी शाळा प्रशासन आणि स्थानिक पोलिसांकडे वारंवार तक्रारी दिल्या, तरीही शाळेचे संचालन मंडळ, शिक्षक आणि पोलिस यंत्रणा यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. या दुर्लक्षामुळे मुलीवर ताण वाढत गेला आणि अखेर तिने टोकाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकारासाठी आमदार सावरकर यांनी सेंट अॅन्स शाळेच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले. दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित शाळेची मान्यता तात्काळ रद्द करावी, अशी त्यांनी ठाम मागणी केली.
तसेच पीडित कुटुंबाला न्याय, आर्थिक मदत आणि मानसिक आधार तत्काळ देण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी सरकारकडे केली. घटनेनंतर राज्यात संताप व्यक्त होत असून सरकार पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





