शहरातील गुन्हे शाखेने एमडी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दोन युवकांना रंगेहात पकडत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून ६९ ग्रॅम एमडी ड्रग्ज, दोन मोबाईल, इलेक्ट्रिक वजनाचे माप आणि पांढरी अॅक्टिव्हा असे एकूण ७.४१ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईतून शहरातील एका मोठ्या ड्रग्ज वितरण जाळ्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून पुढील तपास सुरू आहे.
गुन्हे शाखेचे एपीआय मनीष वाकोडे यांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती की दोन युवक अमरावती न्यू बायपास मार्गे वडाळीच्या दिशेने ड्रग्ज विकण्यासाठी जात आहेत. माहिती खात्रीची असल्याने पथकाने सापळा रचला. काही वेळानंतर संशयास्पद अॅक्टिव्हा (एमएच-27 सीएफ 5395) दिसताच पोलिसांनी वाहन थांबवले आणि तपास सुरू केला.
विचारपूस केली असता दोघांनी आपली नावे मोहम्मद सोफियान मोहम्मद मन्नान (२४, अन्सार नगर, अमरावती) आणि शोएब खान समीर जाम (२४, अमरावती) अशी सांगितली. त्यांची झडती घेतली असता ६९ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळले. आरोपी ड्रग्ज विक्रीसाठी वडाळीकडे जात असल्याची माहिती उघड झाली. या प्रकरणात त्यांच्याकडून ७.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोघांची चौकशी केली असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी अमरावती शहरातील अनेक पुरवठादारांची नावे सांगितली आहेत. यामध्ये अन्सार नगर आणि गवळीपुरा परिसरातील आठ जणांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. यात सैय्यद अल्तमश सैय्यद गफ्फार, गोलू कबीर, आवेज कुरेशी, साकिब कुरेशी, आकीब कुरेशी, शेख नईम उर्फ राजा, शेख नाजमी आणि शेख सोनू या नावांचा समावेश आहे.
या प्रकरणामुळे अमरावतीत ड्रग्ज व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा संशय बळावला आहे. पोलिसांनी या आठ संशयितांचा शोध सुरू केला असून शहरातील ड्रग्ज रॅकेट उघड करण्यासाठी चौकशी सुरू आहे. आरोपी लहान वयोगटातील ग्राहकांना ड्रग्ज पुरवत होते, आणि प्रत्येक खेपेवर त्यांना पैसे मिळत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे ड्रग्ज कुठून आणले जात होते? यामागे मोठा सूत्रधार आहे का? या रॅकेटचे मूळ ठिकाण कोणते? याबाबत चौकशी सुरू आहे. अंमली पदार्थ विरोधी विभाग आणि गुन्हे शाखा एकत्रित तपास करत असून आणखी काही नावे पुढील चौकशीत समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कारवाईमुळे अमरावतीतील ड्रग्ज तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास वेगाने सुरू ठेवला असून संपूर्ण रॅकेट उध्वस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा असून अशा कारवाईची कायमस्वरूपी गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.






