बुलढाणा शहर म्हणजे जिल्ह्याचे मुख्यालय. इथे पोलीस दलाचे नियंत्रण, कार्यालये, वसाहती, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घरे, सर्व काही एकाच पट्ट्यात. हा संपूर्ण परिसर सुरक्षित, संरक्षित आणि चोख सुरक्षेत असल्याचे समजले जात होते. पण या परिसरातच अज्ञात चोरांच्या टोळीने धाडसाने पाऊल टाकत पोलीस दलालाच थेट आव्हान दिले.ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांच्या मनात एकच प्रश्न… आम्ही सुरक्षित नाही, तर नागरिक कसे सुरक्षित?
बुलढाणा शहर म्हणजे जिल्ह्याचे मुख्यालय. इथे पोलीस दलाचे नियंत्रण, कार्यालये, वसाहती, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घरे, सर्व काही एकाच पट्ट्यात. हा संपूर्ण परिसर सुरक्षित, संरक्षित आणि चोख सुरक्षेत असल्याचे समजले जात होते. पण या परिसरातच अज्ञात चोरांच्या टोळीने धाडसाने पाऊल टाकत पोलीस दलालाच थेट आव्हान दिले.
शनिवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ही बाब समोर येताच पोलीस लाईनमध्ये एकच खळबळ उडाली. चर्चेचा विषय फक्त एकच – रात्री चोर कोणी पाहिले का? कोण आवाज झाला का? आणि सर्वात महत्त्वाचे, हे कसे शक्य झाले?
अत्यंत सुनियोजित पद्धतीने चोरांनी वसाहतीतील किमान पाच घरांची निवड केली. यामध्ये एएसआय वारे, पोलीस कॉन्स्टेबल रुबीना पटेल यांच्यासह कनिष्ठ अधिकाऱ्यांची घरे होती. सर्व घरातून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि किंमती वस्तू उचलून नेण्यात आल्या. प्राथमिक अंदाजाने मुद्देमाल सुमारे वीस लाखांच्या आसपास असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे हा परिसर बुलढाणा चिखली राज्य मार्गालगत आहे. चोवीस तास वाहतूक सुरू असते. थप्पड मारली तरी आवाज ऐकू जाणाऱ्या परिसरात चोरांनी पाय ठेवला आणि कोणताही आवाज न करता घरं साफ केली. एवढ्या शिस्तबद्ध आणि चतुराईने केलेल्या डल्ल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
वसाहतीतील रहिवासी पूर्ण रात्री घरातच होते. कोणाला काहीच कळले नाही. सकाळी दरवाजे उघडले आणि घरातील कपाटे, सुटकेस, कपडे इकडे तिकडे पडलेले. पाहताच सगळ्यांना धक्काच बसला. काही घरे तर लोकांनी सकाळी स्वच्छ करून कामावर निघाले होते. चोरीची बातमी ऐकून पुन्हा घरी धाव घेतली.
घटनास्थळी बुलढाणा शहर पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. फिंगरप्रिंट्स, सीसीटीव्ही, वसाहतीतील ये-जा करणाऱ्या वाहनांची माहिती, सर्व तपासणी सुरू आहे.
चोरांची टोळी स्थानिक होती का? बाहेरून आली का? चोरांना परिसराची माहिती आधीपासून होती का? हे सारे प्रश्न आता पोलिसांसमोर उभे आहेत.
अशा कडक सुरक्षा आणि पोलीसांच्या घरांतच चोरी! या घटनेने शहरात अजब चर्चांना उधाण आले आहे.जर चोरांनी पोलिसांच्या घरात हात साफ केला तर सामान्य नागरिकांची काय अवस्था होणार?
बुलढाणा शहर हादरले आहे. तपास सुरू आहे.
पण एक गोष्ट नक्की…या घटनेने पोलिसांमध्येच अस्वस्थता वाढवली आहे.





