अकोला शहरातील चार बंगला परिसरात झालेल्या धाडसी चोरी प्रकरणाचा अवघ्या सहा तासांत पर्दाफाश करत खदान पोलिसांनी आरोपीला अटक केली. डोळ्यात मिरची पावडर फेकून पांढरी बॅग हिसकावून पळालेल्या भामट्यावर पोलिसांनी जलदगतीने कारवाई करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या तातडीच्या आणि प्रभावी तपासासाठी खदान पोलिसांचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुकेश गोपाल बगडिया (वय ५१, रा. गणेश हाउसिंग सोसायटी, गौरक्षण रोड) हे ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवरून जात होते. त्यांच्या जवळ १ लाख २० हजार रुपये असलेली पांढरी बॅग होती. चार बंगल्याजवळ एक अज्ञात आरोपी अचानक त्यांच्या मोटारसायकलसमोर आला. त्याने लाल रंगाची मिरची पावडर त्यांच्या डोळ्यात फेकली आणि क्षणात गोंधळाचा फायदा घेत बॅग हिसकावून पळून गेला.
या धाडसी चोरीची माहिती मिळताच खदान पोलिसांनी अप. क्र. १०१६/२०२५ भादंवि कलम ३०९(६) नुसार गुन्हा नोंदवला. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी घटनास्थळ आणि चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
पो. अं. भुषण मोरे आणि स्वप्नील वानखडे यांनी केलेल्या सीसीटीव्ही विश्लेषणात एक संशयित इसम मोटारसायकलवरून जुडिओ परिसराकडे जाताना दिसला. यानंतर पोलिसांनी जुडिओ परिसरात शोधमोहीम राबवून लिफ्टजवळ एक संशयित इसम ताब्यात घेतला. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपले नाव अनमोल प्रभाकर पिंजरकर (वय ५२, रा. हरीसंकल्प अपार्टमेंट, नाशिक रोड) असे सांगितले.
पुढील तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून जबरी चोरीतील १,२०,००० रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ज्याची किंमत ५०,००० रुपये आणि मोबाईल फोन किंमत १०,००० रुपये असा एकूण १,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक मनोज केदारे, सपोउपनी संजय वानखडे, दिनकर धुंरधर, कर्मचारी गिरीश विर, संतोष गांवडे, अमर पवार, रोहीत पवार, स्वप्नील वानखडे, भुषण मोरे, मंगेश खेडकर आणि संदिप काटकर यांचा सहभाग होता.
शनिवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी खदान पोलिस स्टेशनला भेट देऊन तपास पथकाचे कौतुक केले. जलदगतीने आरोपीस अटक करून मुद्देमाल जप्त करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाजातूनही प्रशंसा होत आहे. नागरिकांनी या प्रकरणी केलेल्या तत्परतेबद्दल खदान पोलिसांचे अभिनंदन केले आहे.




