अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ४ डिसेंबर २०२५: तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड. साधारण 40 हजार लोकसंख्येचं गाव. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली जवळपास 35 आदिवासी खेडी या आरोग्य केंद्रावर अवलंबून. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट. नावाला आयुष्यमान आरोग्य मंदिर. पण प्रत्यक्षात परिस्थिती अशी की मंदिराऐवजी अव्यवस्थेचं स्मशान वाटावं.
आरोग्य सेवांचा बोजवारा किती भयानक पातळीवर गेला आहे, याचा पर्दाफाश झाला तो थेट राज्यातील सत्ताधारी घटकपक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे. सरकारी दर्जा, फलक, योजना, सुविधा यांची यादी कागदोपत्री चमकत असताना आतमध्ये कोणत्या गोष्टी दडलेल्या आहेत याचा अंदाज कुणालाच नव्हता.
ऑपरेशन थिएटरमध्ये काय सापडलं?
आमदार मिटकरी पाहणीसाठी गेले आणि थेट ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचले. आतलं दृश्य पाहून ते स्वतः हादरले. त्यांच्या मते, त्यांना ‘मांसाचे गोळे’ आढळले. या एकाच गोष्टीने हिवरखेडमध्ये धडकी भरली आहे. याचा थेट अर्थ असा की या प्राथमिक आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात सुरू असल्याचा गंभीर संशय त्यांनी व्यक्त केला.
हे आरोप केवळ हलके नाहीत. सरकारी स्तरावर दर्जा असलेल्या आरोग्य मंदिरात असे प्रकार? हा प्रश्न आता गावापासून जिल्हा प्रशासनापर्यंत जळत पोहोचला आहे.
कर्मचारी हजर नाहीत, यंत्रसामग्री बंद, धुळखात पडलेली सुविधा
आमदार मिटकरींनी पाहणीदरम्यान अजून अनेक गोष्टी निदर्शनास आणल्या:
- वेळेवर हजर नसलेले कर्मचारी
- बंद अवस्थेत धुळीनं माखलेली यंत्रसामग्री
- दुरवस्थेतील रुग्णालय
- स्वच्छतेचा पूर्ण अभाव
- रुग्णांची होत असलेली पिळवणूक
हे दृश्य पाहिल्यानंतर “हे आरोग्य मंदिर आहे की दुर्लक्षाचं केंद्र?” असा सरळ प्रश्न मिटकरींनी प्रशासनासमोर उपस्थित केला.
गर्भपाताचा संशय: हिवरखेड हादरलं
ऑपरेशन थिएटरमध्ये सापडलेल्या ‘मांसाच्या गोळ्यां’वरून अवैध गर्भपात होत असल्याचा दावा हा गावात मोठा चर्चेचा मुद्दा आहे. 40 हजार लोकसंख्या आणि आजूबाजूच्या आदिवासी खेड्यांसाठी हेच केंद्र जीवनरेषा. पण इथल्या भयानक स्थितीने सर्वांची झोप उडाली आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
मिटकरींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दोघांकडेही लिखित स्वरूपात मागणी केली:
- या आरोग्य केंद्रातील अवैध गर्भपाताच्या शक्यतेची
- संपूर्ण उच्चस्तरीय चौकशी
- आणि दोषींवर कठोर कारवाई
हिवरखेडसारख्या महत्त्वाच्या केंद्रात एवढं मोठं गैरप्रकार असू शकतो? हा प्रश्न आता संपूर्ण जिल्ह्यात फिरतोय.
सरकार आणि प्रशासन कसली वाट पाहतंय?
आता सगळ्या नागरिकांच्या नजरा एका प्रश्नावर खिळल्या आहेत.
आमदार मिटकरींच्या गंभीर आरोपांवर सरकार आणि प्रशासन कोणती कारवाई करते?
राजकारण असो वा चौकशी, पण आरोग्य केंद्रातला हा कथित प्रकार जर खरा ठरला तर तो केवळ हिवरखेडसाठी नाही तर संपूर्ण राज्यासाठी धोक्याची घंटा ठरेल.
आजचे प्रश्न स्पष्ट आहेत.
गावाचं आरोग्य मंदिर खरंच मंदिर आहे का?
की आत काहीतरी वेगळंच सुरू आहे, ज्याचं थरकाप उडवणारे रूप उघड झालंय?





