WhatsApp

गाव हादरलं! अपहरणाचा प्रयत्न की काहीतरी वेगळंच?हिवरखेडमध्ये नेमकं काय घडलं चिमुकलीसोबत!

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २ डिसेंबर २०२५:हिवरखेडमध्ये निवडणुकीची लगबग सुरू आहे. सगळं प्रशासन, पोलीस बंदोबस्त, अधिकारी यांची धावपळ मतदानाच्या कामात गुंतली आहे. गावभर राजकीय चर्चा तापल्या आहेत. अशातच या गोंधळाचा फायदा घेत एक संशयित व्यक्ती सात वर्षांच्या निरागस मुलीला लक्ष्य करतो, तिला उचलून नेण्याचा प्रयत्न करतो आणि संपूर्ण हिवरखेड दणाणून जातं. गावभर संतापाची लाट उसळते.



ही घटना दत्त भारती मंदिराजवळ दुपारच्या सुमारास घडली. मुलं शाळेतून घरी परतू लागले होते. काही महिला जवळच्या रस्त्यावरच्या किराणा दुकानांकडे जाण्याच्या तयारीत होत्या. वातावरण अगदी सामान्य. पण अचानक एका व्यक्तीने सात वर्षांच्या चिमुकलीला उचलून पुढील चौकाकडे नेण्याचा प्रयत्न केला अशी नागरिकांनी माहिती दिली. चौकात लोक उपस्थित असल्याचं लक्षात येताच त्या व्यक्तीने मुलीला तिथेच सोडून दिलं आणि एका गल्लीमार्गे पसार झाला

इथेच कथा संपली असती तर ठीक होतं, पण काही मिनिटांतच तोच संशयित पुन्हा दुसऱ्या गल्लीने परत येतो. त्याच मुलीला पुन्हा उचलण्याचा प्रयत्न करतो. मुलीने ओरड सुरू केली. महिलांनी पाहताच आरडाओरड केली. परिसरात अचानक एकच धांदल उडाली. मुलं घाबरून बाजूला पळाली, पण परिसरातील महिलांनी आणि तरुणांनी एकदम जमवाजमव करून त्या व्यक्तीला पळण्यास भाग पाडलं.

वेटाळातील युवकांनी तात्काळ परिस्थिती हाती घेतली. काही युवकांनी दुचाकी घेतली आणि त्याच्या दिशेने धाव घेतली. लोकांच्या सांगण्यावरून त्याचा मार्ग काढत ते स्वस्तिक कॉलनीच्या दिशेने गेले. जवळपास अर्धा किलोमीटरचा पाठलाग सुरू होता. गावातील शेकडो लोकांच्या रोषाच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. पळत असलेला आरोपी गल्लोगल्ली पळून सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण युवकांनी त्याला शेवटी पकडलं. त्याला जमावाने पकडून जागेवरच बसवून ठेवले.

Watch Ad

येताच गावातील हवा बदलली. लोकांच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप दिसत होता. “हे काय चाललंय गावात? पोलिस निवडणुकीत, मग आपली मुलं कोण सांभाळणार?” अशी चर्चा जोरात सुरू झाली. पीडित मुलीला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. नागरिकांनी तात्काळ हिवरखेड पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीनंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आहे.

दुसरीकडे त्या मुलीचे पालक थेट हिवरखेड पोलीस ठाण्यात धावले आणि घटनेची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली. घरचा निरागस जीव थोडक्यात वाचल्याचं जाणवल्यावर पालकांच्या भावना आवरल्या जात नव्हत्या. आईच्या डोळ्यांत अश्रू तर वडिलांच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप.

या घटनेमुळे हिवरखेड परिसरात पसरलेला तणाव अजूनही कायम आहे. लोकांच्या मनात एकच प्रश्न. “निवडणुकीच्या दिवशी पोलीस यंत्रणा इतकी व्यस्त असते तर मुलांच्या सुरक्षेचं काय?”

निवडणुकीचा फायदा घेत मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा हा पुरेपूर धाडसी, थरकाप उडवणारा प्रकार म्हणून नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. संशयित व्यक्तीची चौकशी सुरू असून पोलिसांनी त्याची माहिती गोळा केली आहे. तो गावातील नाही का? मानसिक स्थिती ठीक आहे का? याचीही तपासणी सुरू आहे.

निवडणूक तापली आहे. गावात राजकीय हालचालींची गर्दी आहे. परंतु या घटनेनं हिवरखेडला सर्वांत मोठा प्रश्न समोर आणला आहे. “गावातली मुलं किती सुरक्षित?”

आता नागरिकांची एकच मागणी आहे. असा प्रकार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी. गावातील सुरक्षेवर अधिक कडक पावलं उचलावीत. आणि विशेष म्हणजे मतदानाचा काळ असो किंवा नसो, पोलीस बंदोबस्ताला हवं तेव्हा नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावं.

हिवरखेडच्या दत्त भारती मंदिराजवळ घडलेल्या या दुहेरी अपहरणप्रयत्नाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. गावच नव्हे तर जिल्ह्यातही या बातमीने खळबळ उडाली आहे.

लोकांचा एकच सूर.
“वेळीच जागे झालेले युवक नसते तर आज काय भयानक घडलं असतं कोण जाणे.”

Leave a Comment

error: Content is protected !!