अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १डिसेंबर २०२५:बुलढाणा पालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी शहरात अनपेक्षित घडामोडींची मालिकाच उलगडली. जिल्ह्याचे मुख्यालय आणि पोलीस मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात काँग्रेसच्या प्रचार फलकावर काळे ऑइल टाकून विटंबना करण्यात आली. सकाळीच ही माहिती पसरताच मुस्लीमबहुल तेलगू नगर परिसरात तणाव वाढला. स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला.
तेलगू नगर चौकातील एका घरावर परवानगी घेऊन लावण्यात आलेला काँग्रेसच्या अध्यक्षीय उमेदवार लक्ष्मी दत्ता काकस यांचा फलक रात्रीत ऑइलने खराब करण्यात आल्याचे आज सकाळी उघड झाले. काही क्षणातच चौकात जमाव जमा झाला.
तणाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि पालिका पथकाने तात्काळ परिसर गाठला. पोलिसांच्या मदतीने ऑइलने माखलेला फलक खाली उतरवण्यात आला. प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी केली आणि अखेर जमाव शांतपणे पांगला.
पोलिसांनी विटंबना केलेला फलक आणि लोखंडी सांगाडा जप्त करून तपासासाठी पोलिस ठाण्यात नेला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन तोंडी तक्रार नोंदवली. प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास करावा, असा आग्रह धरला.
दरम्यान, उद्या २ डिसेंबरला मतदान असल्याने पोलीस बंदोबस्ताच्या तयारीत व्यस्त होते. त्यामुळे औपचारिक तक्रार थोड्याच वेळात नोंदवली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
नगरपालिकेच्या ३० जागांसाठीची निवडणूक यंदा हायव्होल्टेज ठरली आहे. भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यात ही प्रतिष्ठेची लढत मानली जाते. अध्यक्षपदासाठी अर्पिता शिंदे, पूजा गायकवाड आणि लक्ष्मी काकस या तिघी उमेदवारांनी वातावरण तापवले आहे.
मोठ्या राजकीय धुरळ्यात काँग्रेसच्या फलका ची मतदानाच्या तोंडावर झालेली विटंबना हा नवा कलाटणी देणारा प्रसंग ठरला आहे. त्यामुळे मतदान आणि मतमोजणीच्या काळात पोलिसांना अधिक सजग राहावे लागणार आहे, हे स्पष्ट दिसते.





