अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो अकोट तालुका प्रतिनिधी अकोट, दि. 26 नोव्हेंबर २०२५: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उद्याच्या अकोला जिल्हा दौऱ्यापूर्वी दहिहंडा–फाटा–गोपालखेड रस्ता हा स्थानिक जनतेच्या संतापाचा मुद्दा बनला आहे. खड्ड्यांनी भरलेला आणि जीवघेणा बनलेला हा मार्ग आता नागरिकांना “मृत्यूमार्ग” वाटू लागला आहे. याच निषेधार्थ रयत शेतकरी संघटनेने उद्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

काम नाही, आश्वासने मात्र ढिगाने: पूर्णाजी खोडके
या संदर्भात रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ विभागीय युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“या रस्त्याबाबत आम्ही वारंवार निवेदनं दिली. अल्टिमेट दिले. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासने दिली. पण प्रत्यक्षात काम एक इंचही पुढे नाही. सर्व कागदावरच. त्यामुळेच उद्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निष्क्रियतेचा भंडाफोड करू,” असे खोडके म्हणाले.
शेकडो जीव धोक्यात… त्यामुळेच कठोर इशारा
खोडके पुढे म्हणाले, “हा रस्ता रोज शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालतो. उद्या दादांचा ताफा या मार्गाने जाणार आहे. आम्ही शांततापूर्ण पण कठोर पद्धतीने त्यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवणार आहोत. ही आमची शेवटची टोकाची हाक आहे.”
मुख्य मागण्या
रयत शेतकरी संघटना तसेच स्थानिक नागरिकांनी प्रशासनापुढे खालील मागण्या ठामपणे मांडल्या आहेत—
• दहिहंडा–फाटा–गोपालखेड रस्त्याचे पूर्णपणे नव्याने, दर्जेदार डांबरीकरण करावे.
• निष्क्रिय अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी.
• शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि तातडीची बैठक घ्यावी.
• रस्त्याचे डांबरीकरण तातडीने सुरू करावे.
जिल्ह्याचे लक्ष उद्याच्या आंदोलनावर
अकोट तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता उपमुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या ताफ्यावर आणि रयत शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर लागले आहे. रस्ता दुरुस्तीच्या दीर्घ प्रलंबित प्रश्नाला यानिमित्ताने तोडगा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.





